शनिवार, ७ जून, २०१४

वादळवारे नेहमीचेच !



वादळवारे नेहमीचेच आहेत या भूतलावर 
भरती ओहोटीचा खेळ देखील पुराणाच 
पायाखालची सरकती जमीनही ओळखीची 
ग्रह ताऱ्यांची अस्थिरता सिद्ध झालेली 
चंद्र सूर्याचा लपंडावही शास्त्रावर आधारित 
जरा ..व्याधी ..मृत्यूचे गणित सर्वदूर 
दुखः ..आनंद , आशा..निराशा अनिवार्यच 
अपघात ..अकस्मात ..योगायोगच सारे 
तरीही गगन गवसणीची स्वप्ने असतातच
सागर कवेत घेण्याची उमेदही संपत नाही
चंद्र ताऱ्याच्या प्रदेशाचे मनसुबे प्रत्येकाचेच
अशाश्वतच्या डावाची निश्चिती असूनही
जुगारी मनाची उमेद असायला हवी सर्वाना
तरच होईल जगणे सुकर सोपे न सहज !

....तुषार नातू !

हरलेले पालकत्व !


जन्म घेणाऱ्या बाळाची तब्येत तपासली
तुम्ही नियमित सोनोग्राफीच्या यंत्राद्वारे 
घरात कुलदीपक येणार म्हणून नाचलेही 
त्याच्या जन्मानंतर पेढे वाटले आनंदाने 

जन्मानंतर त्याला न्हाऊ माखू घालताना 
धन्य झाली आई अन बापाचे मास वाढले 
आकार घेत मोठा होत जाणारा गुणी बाळ 
हिंस्त्र लांडगा होतो की क्रूरकर्मी वन्य पशु

त्याच्यात एखादा सिद्धार्थ उदय पावतोय
अथवा छत्रपती , किमान सत्कर्मी मानव
या कडे लक्ष देण्यात मात्र तुम्ही हरलात
सपशेल पराभव हा तुमच्या पालकत्वाचा

तुमचा असलेला राजकुमार राजरोसपणे
अब्रू लुटतोय आता कोण्या आईबापाच्या
गोजिरवाण्या गोड अबला राजकुमारीची
नग्न फासावर देत जहाल तेजाब पाजून

त्याला चटक लागलीय करूण किंकाळ्या
ऐकण्याची अन शरीराचे लचके तोडण्याची
रक्तपिपासू हिंस्त्र जनावरे फिरत आहेत
हरलेल्या पालकांची आंधळ्या धृतराष्ट्रांची

राजकन्यांनो तुम्ही व्हा महिषासुर मर्दिनी
कठोर करा कोमल हृदय असुर दिसल्यावर
नरडीचा घोट घ्या बिनदिक्कत लांडग्यांचा
नाहीतर अपमानित होत रहा अबला बनून

..तुषार नातू !

( सर्वत्र माजलेल्या लांडग्यांना समर्पित )

धर्मांधतेच्या टोकावर !


धर्मांधतेच्या टोकावर उरतात फक्त 
लाठ्या ..तलवारी ..बंदुका ...बॉम्ब 
रक्तपिपासू श्वापदे...व खुनी दरींदे 
व्यर्थ ठरतात सारे नमाज ..प्रार्थना 
बंधुभाव.....भाईचारा...केविलवाणा 

कृष्णाचे प्रेम ...प्रेषिताची कलमे 
बुद्धाचे कारुण्य ....येशूचे बलिदान 
सुळावर चढतात साऱ्या देव देवता
सुरु होते बीभत्स असुरांचे राज्य
किळसवाण्या डूाक्युलांचे .थैमान

राजकीय मनसुबे ..तेजीत येतात
सर्वसामान्यांना.. .वेठीस धरतात
कुरुक्षेत्रावर पांडवच बळी जातात
कौरव मात्र ...सुरेक्षेच्या तटबंदीत
नवनवीन डाव खेळतच असतात

......तुषार नातू !