रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

अस्मितेची रेसिपी !



पूर्वजांच्या ऐतिहासिक पराक्रमाचे गोडवे 
जातीतल्या थोर पुरुषांचे ...असाधारण कर्तुत्व 
भाषा ..धर्म ..परंपरा....संस्कृतीचा.. गरम मसाला 
सापेक्ष इतिहास ..सोयीस्कर भूगोल . जातीच्या लोकसंख्येचे गणित 
समृद्धी ..प्रगती ..कौटुंबिक कल्याण ..सामाजिक कार्य या इच्छांची फोडणी 
अशी सर्व जय्यत तयारी करून मी माझी ' अस्मिता ' चांगलीच मुरवत ठेवलीय 
माझ्या नाकर्तेपणाला लपवून ..अस्मितेचा ढोल बडवून ..बेंबीच्या देठापासून बोंबा मारल्या 
आणि मग प्रत्येक वेळी ..प्रत्येक प्रश्न ' अस्मितेचा ' केला की विजयश्री ...विरोधक गप्पच !!!

तुषार नातू ..!

बाळा !



बाळा..अरे काल प्रथमच जाणवले 
तू आता मोठा झाला आहेस 
तुझ्या इच्छांसाठी आग्रही 
हट्टी ..आणि बेदरकार 
इतका जास्त की
डोळ्याला डोळा 
भिडवणारा !

अगदी परवा परवा पर्यंत तर तू
अंधारालाही घाबरत होतास
आईचा पदर तुझी ढाल
बाबांचे नाव तलवार
विसरला की काय
तुझ्या धैर्याचे
अखंड स्त्रोत

दोन पायावर उभा राहताना तोल
सावरण्यासाठीची तुझी धडपड
आणि आधारासाठी तू पुढे
केलेले ते असहाय हात
मी कसा विसरू सांग
आधार दिल्यावरचे
तुझे कृतज्ञ डोळे

जन्मानंतर तुला हाती घेताना
अनुभवलेले रोमांचक क्षण
विसरणे मला शक्य नाही
सारे आभाळ पेलण्याची
ताकद मिळाली होती
मला तुझ्या त्या
रेशीम स्पर्शाने

तुझ्या आईच्या डोळ्यातले
सार्थकतेचे भाव साठवून
ठेवलेत मी हृदयात
म्हणूनच तिच्याही
मायेला तू जेव्हा
ओलीस ठेवले
मी विदीर्ण !

एक नक्की कर तू जमले तर
तू जेव्हा बाप होशील तेव्हा
तुझ्या बाळाला हाती घेवू
नकोस तू अजिबातच
नाहीतर तू देखील
असाच घायाळ
होशील कधी !

.....तुषार नातू !

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०१४

मनाचे रहस्य !


कधी वाटले मला समजले मनाचे सर्व रहस्य 
मनासारखे घडते तेव्हा ओठी उमलते हास्य 
मनाविरुद्ध झाले की बोचतात असंख्य काटे 
प्रत्येक गोष्टीला फुटत जातात अगणित फाटे 

मनाचा मागोवा घ्या नेटका सदोदित निरंतर 
कमी होईल तेव्हा दोन मनातील वाढते अंतर
भावना मनातल्या ..बसावे निवांत निरखत
शिवता येईल मनाला एक अभेद्य चिलखत

मन कधी स्वार्थी .कपटी ..घायाळ ..वैरागी
लाचार लोचट भोगी... कधी निर्मळ त्यागी
मनाच्या सुप्त छटा मनालाच करती सुन्न
मन सगळीकडे सारखेच माणसे जरी भिन्न

मनाला शांत ठेवा भावना जरी खूप अनावर
विचारांचा हल्ला होईल तरी रहा भानावर
मन बंडही करेल जेव्हा अंकुश लागेल त्यावर
मनाच्या मुसक्या बांधून राज्य करा मनावर

....तुषार नातू !

त्याचे नी माझे !


त्याचे आणि माझे वैर तसे जुने 
तो उर्मट तिरसट विक्षिप्त
मी लाघवी पेमळ स्नेहाचे गाणे 
तो अहंकारी भोगात लिप्त 

माझे मवाळ विश्वशांतीचे तराणे 
तो प्रेम दये पासून अलिप्त 
माझ्या मनी सदा करुणेचे बहरणे 
खुन्नस इर्षा .त्याचे आप्त

माझ्यातच दडलेले त्याचे गाऱ्हाणे
युध्द आमचे आहे नेमस्त
जिंकणार तोच असे त्याचे म्हणणे
त्याला हरवणे क्रमप्राप्त

...तुषार नातू !

स्वातंत्र्य ????????


बाळ तर निसर्गत: मुक्तच जन्माला आलेले 
जन्मताच जातीचे धर्माचे बंधन मिळाले 
भगवा हिरवा निळा पांढरा रंगात रंगले 
देश..भाषा..प्रदेशाचे ..अलंकार चढले 
लंगोटी बांधून सुसंस्कृत केले गेले 
नात्यांच्या बंधनात बाळ सापडले 
शाळाकॉलेजात त्याला जखडले 
करियरसाठीच पुढे ढकलले
बाळ जवाबदार बनले

कायद्याच्या चौकटीत त्याला पक्के बसवले
लग्नाच्या बेडीत वाजतगाजत अडकवले
पोराबाळांच्या गराड्यात खुशीत बसले
घड्याळ्याच्या काट्यावरच चालले
केस पांढरे झाले टक्कल पडले
काठीच्या आधाराला अडले
औषधांच्या बळाने तगले
श्वासांचे बंधन तुटले
बाळ मुक्त झाले

तुषार नातू ( १५ ऑगस्ट २०१४ )

शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

देवाची इच्छा !



काय कसे काय चाललेय ? ..या त्याच्या प्रश्नावर
मी तोंड भरून हसलो ..म्हणालो सगळे काही ठीक
चाललेय ...छानच चाललेय की ....देवाच्या कृपेने
माझ्या उत्तरावर तो वैतागला ..मग किंचाळला
यात देवाची कृपा कसली आलीय डोंबलाची मुर्खा
पुढेही बरेच काही बोलला ..करवादला..थयथयला

अरे तू शिक्षण घेतलेस ..तू अपार कष्ट करतोस
स्वताची. परिवाराची जवाबदारी घेतोस खांद्यावर .
पैसे कमावतोस .वस्तू खरेदी करतोस ..फिरतोस
देवाला रे कशाला मध्ये आणतोस ? तुम्ही लोक
म्हणजे कोडेच आहात ....फालतू तत्वज्ञान आहे
तुमचे देव बीव सब झूठ. ..सायन्स आहे सगळे

मी जरा बुचकळ्यात पडलो .चमकत्या डोळ्यांनी
धारधार प्रश्नार्थक चेहऱ्याने .विजयी अविर्भावात
तो मला निरखत राहिला .मग कुत्सितसा हसला
मी म्हणालो ..अरे माझा श्वास आत्ता सुरु आहे
माझे डोके ठिकाणावर आहे ..शरीराच्या क्रियाही
सुरळीत सुरु आहेत ..यात माझे कोणते क्रेडीट ?

रोज अपघाताने ..हार्ट अॅटॅकने ..पूर ..भूकंपाने
नकोशा आजाराने ...अनेक अकस्मात मरतात
आज मी जिवंत आहे ..आपण दोघेही बोलतोय
यात कोणते सायन्स आहे ..शोध लागलाय का
आपण का जिवंत आहोत याचा ...श्वास ठीक
का चाललय याचा ? जेव्हा अकस्मात मृत्यूचे
कोडे उलगडेल तेव्हा. म्हणीन हे सायन्स आहे

तो जरा विचारात पडल्यासारखा..मग म्हणाला
तुम्ही अंधश्रद्धाळू लोक ऐकणार नाहीत कुणाचे
आपल्या बुद्धीवरचा पडदा काढा .जरा डोळसपणे
विचार करा .. फेकून द्या हे देवाचे जड जोखड
जगा मुक्त ...स्वच्छंद ...श्रेष्ठ मानव आहात
हे का विसरता आहात .. तो क्रांतीच्या गप्पात

मी स्तब्ध ..निश्चल ...निर्धारी तरीही विचारी
शेवटी तो मला बाय म्हणाला ....निघून गेला
बराच वेळ तो गेल्या दिशेला मी पाहत राहिलो
दुसऱ्या दिवशी समजले त्याला अपघात झाला
मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसून तो गेला
जीवन -मृत्यू कोणाला चुकला ..देवाची इच्छा !

..तुषार नातू !

मध्यमवर्गीय !


" शेवटी आपण पडलो मध्यमवर्गीय "
या वाक्याने शेवट करत नेहमीच
आम्ही स्वतःला जखडून ठेवत आलो
कितीही संताप झाला तरी फक्त
आपसातच तावातावाने भांडलो
एकमेकातच रमलो भेद जपत

प्रत्येक ठिकाणी माघार घेत आम्ही
नकळत प्रोत्साहन दिले गुंडगिरीला
सहनशीलतेने घडवले भ्रष्ट नेते
आमच्या पोरीबाळीना छेडणाऱ्यांना
हात जोडून विनंती केली नंतर मग
आनंदलो आमच्या मुसद्देगिरीवर

सरकारी वर्दीला सर्वदा घाबरलो
कोर्टाच्या पायरीपाशीच थबकलो
प्रसंगी नोट पुढे करून लाचारीने
पोसत राहिलो सर्व लाचखोरांना
अहो हल्ली असे चालतेच म्हणत
नैतिकतेची व्याप्ती वाढवत

वेगवेगळ्या गटात विभागलो गेलो
राजकारण्यांना तर दबूनच राहिलो
खोटी अस्मिता जपत घरात उद्रेकलो
चर्चा , समिती , चौकशीच्या घोळात
बौद्धिक मैथुनात रमलो , विसंबून
राहिलो परमेश्वराच्या न्यायावर

..तुषार नातू !

एकंदरीत सांगायचे तर !



एकंदरीत सांगायचे तर...मित्रा तुझा विकास तूच कर
रात्रंदिन कष्ट कर .. टॅक्स भरून तुझे देशप्रेम सिद्ध कर
समस्या झाल्या ढीगभर..तेव्हा महागाईचा स्वीकार कर
राजकारण्यांनी हागलेले सुद्धा ....ताठ मानेने साफ कर
घोटाळ्यांनी झालेले नुकसान ...मोठ्या मनाने माफ कर
शहीद सैनिकांची आठवण ठेवून ..तू ही थोडा त्याग कर
स्विसबँक विसरून जा ..लक्षात ठेव देशाचा विकास दर
करोडो लोकांचा विचार करून ..महागाईकडे दुर्लक्ष कर

...तुषार नातू !

मनाची फोलपटे !



विचारांचा सुनामी चकवा ..मनाला अविरत थकवा
उसळत्या सागरात नाखवा ....वाचेल कसा दाखवा
मनाचे नेहमीचे काटेरी रंग...हृदयात जसा निवडुंग
अधांतरी भावनांचा संग ..जसा पिसाळलेला भुजंग
नाठाळ चंचल चपळ पोर ....सततचा जीवाला घोर
अमावास्येला घरात चोर .. जसे रस्ता चुकलेले ढोर

..तुषार नातू !

कोंडवाडा !


तुझा जन्म ..तुझा मृत्यू ..तुझ्या हाती नाही
तुला आई बाबा निवडण्याचा. अधिकार नाही
तुझे रंगरूप कसे असेल ..ठरवता येणार नाही
अनिश्चित घटनांवर.. कवडीचे नियंत्रण नाही
अपघात , नैसर्गिक आपदा .आवाक्यात नाही
पुढचा श्वास घेशील का ..याची शाश्वती नाही

मी ..माझे..मला हा तुझा खटाटोप व्यर्थ आहे
नियती नावाचा राक्षस सदाचाच टपलेला आहे
श्रद्धेचा अनाकलनीय मार्ग .चोखाळायचा आहे
कर्म फलाचा सिद्धांत तुला सांभाळायचा आहे
विचारांना दिशा देण्याचा ..अधिकार तुला आहे
भावनांचे गणित तुझे तुलाच सोडवायचे आहे

..तुषार नातू !

तू कधी आरक्षण मागू नकोस !


बेटा ..काही फरक पडणार नाही
तू उगाचच असा बिथरू नकोस
शुद्ध गुणवत्तेला पर्याय नसतो
सत्य तू कधीच विसरू नकोस
कुबड्यांची स्वप्ने पाहू नकोस
राजकारणाला बळी पडू नकोस

तू कधी आरक्षण मागू नकोस

तू आरक्षित आहे मानव म्हणून
सर्व इतर प्राण्यात श्रेष्ठ म्हणून
बुद्धी , हातपाय हे वरदान म्हणून
विवेक तुझा कधी गमावू नकोस
नोकरीचीही चिंता तू करू नकोस
हिरा आहेस खाणीत लपू नकोस

तू कधी आरक्षण मागू नकोस

तुलना करून निराश होऊ नकोस
अन्याय म्हणूनही बोंबलू नकोस
भविष्याच्या चिंतेने कोकलू नको
श्रम , प्रामाणिकता सोडू नकोस
चिकाटी .,सातत्य त्यागू नकोस
समतेचा पाणउतारा करू नकोस

तू कधी आरक्षण मागू नकोस !

..तुषार नातू !

चित्त दुष्काळी !



अविरत कोसळणारा पाऊस..तरीही मनाची तलखी कायम
सर्वांगी चिंब भिजून ओलेता . तरीही मी अंतरी कोरडलेला
शुष्क जमीन गंधाळूनही ..माझ्या मनातला वैशाख धुरळा
हिरवी पालवी न्हाऊन टवटवीत ...मीच मलूल कोमेजलेला
श्रावणाचे शुभशकून जागोजागी..चित्तच नेहमीचे दुष्काळी

...तुषार नातू !

आठवणींचा गाव !


वाटले होते कालौघात बुडेल
तिच्या आठवणींचा रम्य गाव

पुसले जाईल अगदी नक्की
माझ्या श्वासावरचे तिचे नाव

मग झोपेन मी शांत निवांत
विसरून जाईन.. हरलेला डाव

तुला कसे जमले मला सांग
कसे खोडलेस तू सुगंधी घाव

...तुषार नातू !

बेवफा हो ' आप ' !


कितने जल्दी बेवफा बन गये ' आप '

दिल्लीवालो को धोका देकर
वफाँ कि मिसांल बनना चाहते हो ' आप '

इमानदारीकी राजनीती का वास्ता
लेकीन झुठ पर झुठ बोले जा रहे हो ' आप '

हवा में अफवाहों के तीर चलाकर
बारबार निशाना बदलकर गुमराह हो रहे है ' आप '

खुद के खेमेंमें में बगावत की बु है
और दुसरों के फंटे में पैर फंसाकर नाच रहे है ' आप '

जिस गंदगी को साफ करने निकल पडे थे
उसी गंदगी का हिस्सा बनकर उसी में खुश पडे है ' आप '

सत्ता के लालच का एक अच्छा नमुना बनकर
हमेशा के लिये किचड में खेलेंगे होली जनता के साथ ' आप "

..तुषार नातू !

आठवणींचा पसारा !


आठवणींच्या फाफटपसाऱ्यात तू चटकन सापडतेस
कितीही बाजूला केले तरी ..पुन्हा मनात डोकवतेस
फुलपाखरी कालखंडाचे ..चटके मनाला देत राहतेस
मनातला कचरा..सांभाळून ठेवण्यास भाग पाडतेस

...तुषार नातू !

मनाचे रहस्य !


कधी वाटले मला समजले मनाचे सर्व रहस्य
मनासारखे घडते तेव्हा ओठी उमलते हास्य
मनाविरुद्ध झाले की बोचतात असंख्य काटे
प्रत्येक गोष्टीला फुटत जातात अगणित फाटे

मनाचा मागोवा घ्या नेटका सदोदित निरंतर
कमी होईल तेव्हा दोन मनातील वाढते अंतर
भावना मनातल्या ..बसावे निवांत निरखत
शिवता येईल मनाला एक अभेद्य चिलखत

मन कधी स्वार्थी .कपटी ..घायाळ ..वैरागी
लाचार लोचट भोगी... कधी निर्मळ त्यागी
मनाच्या सुप्त छटा मनालाच करती सुन्न
मन सगळीकडे सारखेच माणसे जरी भिन्न

मनाला शांत ठेवा भावना जरी खूप अनावर
विचारांचा हल्ला होईल तरी रहा भानावर
मन बंडही करेल जेव्हा अंकुश लागेल त्यावर
मनाच्या मुसक्या बांधून राज्य करा मनावर

....तुषार नातू !

त्याचे नी माझे !

त्याचे आणि माझे वैर तसे जुने
तो उर्मट तिरसट विक्षिप्त
मी लाघवी पेमळ स्नेहाचे गाणे
तो अहंकारी भोगात लिप्त

माझे मवाळ विश्वशांतीचे तराणे
तो प्रेम दये पासून अलिप्त
माझ्या मनी सदा करुणेचे बहरणे
खुन्नस इर्षा .त्याचे आप्त

माझ्यातच दडलेले त्याचे गाऱ्हाणे
युध्द आमचे आहे नेमस्त
जिंकणार तोच असे त्याचे म्हणणे
त्याला हरवणे क्रमप्राप्त

...तुषार नातू !

सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

हिरवे कोंब

हिरवे कोंब दुर्मिळ ...मातीतलीच दुष्ट भेसळ 
समाजमनाची मरगळ ..नैतिकतेची पानगळ 
स्वार्थाचा बोलबाला .. ..सत्तेचा गोपालकाला
नेत्यांचे साजिरे रूप ...त्यांच्याच पोळीवर तूप
जातीपातींची मिठाई ..तोंड गोड करायची घाई 

...तुषार नातू .

सांभाळ रे बाबा !

सांभाळ रे बाबा !

चला ..झालास एकदाचा चांगला उत्तीर्ण 
आता नवे कॉलेज ..नवीन मित्र -मैत्रिणी 
आईबापाच्या मनात .दिवाळीची रोषणाई 
तुझ्या डोळ्यातली अथांग क्षितीज भरारी 
रोमरोमात चैतन्य..मन स्वच्छंद पाखरू 
नाकाखाली उमटणारी.. मिशीची नवलाई 

सांभाळ रे बाबा ! 

आताच खरी परीक्षा सुरु झालीय रे तुझी
मोहाचे मायावी विश्व तुझ्या आवाक्यात
जास्तीचा पैसाही येईल तुझ्या खिश्यात
खर्चाचे तारतम्य सहज सुटण्याची खात्री
तंबाखू.. .सिगारेट....गुटख्याचे प्रलोभन
आभ्यासाच्या पुस्तकांना कंटाळेल मन

सांभाळ रे बाबा !

उन्मादाचा जल्लोष ..सोबत्यांचा आग्रह
क्लब्ज पार्टी अन थिरकणारी धुंद पावले
बाईक..कार..व वेगाचा रोमहर्षक थरार
नाजूक नख-यांची रेलचेल सभोवताली
गालावर लाली...डोळ्यांचे जादुई विभ्रम
प्रेमाचा साक्षात्कार.फितूर मनांचे करार

सांभाळ रे बाबा !

तू बापाचा त्याग कधीही विसरू नकोस
आईच्या वेड्या मायेलाही दुखावू नकोस
मन विचलित करून वहात जावू नकोस
नौका तुझ्या जीवनाची आहे रे अनमोल
भ्रमांच्या सागरात या जगाच्या भूलैयात
आईबापाची स्वप्ने कधीच विकू नकोस

..तुषार नातू !

( दहावी ..बारावी उत्तीर्ण नवतरुणांना समर्पित )

हल्ली नेहमीच !



हल्ली नेहमीच धमन्यातून रक्त उसळते 
मनातून शिव्यांची लाखोली उमटते 
ठिसूळ होत जाणाऱ्या हाडात स्फोट होतात 
वर्तमान पत्र उघडले की हे वाढते 
बातम्या पहिल्यावर ठिणगी उडते मनात 
पांढरे बगळे अन काळे कावळे 
जोडीने शिकार करताना पाहून मी उद्रेकतो 
लांडग्यांची क्रूर वासनाग्रस्त चाल 
अनाघ्रात कळ्यांची ससेहोलपट जीवघेणी
रक्तपिपासू गिधाडांचे थैमान
बेघर शेळ्यामेंढ्याचा केविलवाणा आकांत
हे सगळे नकोसे होतेय
बायको म्हणते ..तुम्ही उगाचच चिडता
सदासर्वदा संतापता
तुमचा वाढता रक्तदाब आमची काळजी
नसते विचार करत बसता
त्यापेक्षा आंधळे व्हाल तर बरे होईल की
म्हणजे दृष्टीआड सृष्टी !
तिला एकदा ठणकावून सांगणार आहे मी
अग.जगात आंधळे वाढलेत
हेच तर माझे प्रमुख एकमेव दुखणे आहे

...तुषार नातू !

संथ ..सुस्त..सरपटणारी !



एखादी सकाळ असते संथ.. सुस्त अजगरी 
साऱ्या क्षमता गिळून आळसात सरपटणारी

गच्च भरलेल्या आभाळासारखी कोंदटलेली 
भावनांची कोठारे गळू सारखी ठसठसलेली 

गतकाळच्या स्मृतींमध्येच अखंड बुडालेली 
वर्तमान नाकारून.. भविष्यावरच रुसलेली 

काल .आज .उद्याच्या चक्राला कंटाळलेली
उपेक्षांच्या ओझ्याखाली दबून हिरमुसलेली

....तुषार नातू !

सिमेंटच्या जंगलात !



सिमेंटच्या जंगलात .पडणार अश्रूंचाच पाऊस
मातीच्या गंधाला तरी ..नको रे पारखा होवूस 
तृष्णेचा आकांत बैचैन मनाचे शुष्क आभाळ 
वनराईंचा कत्तलखाना हिरवाईचा कर्दनकाळ 
निसर्गाचा आक्रोश तरी नको कानाआड करूस 
मनाचा ओलाव्याला ..नको तिलांजली देवूस 

वरुणराजा तुला साकडे नको रे असा रागावूस 
लेकरू चुकले म्हणून .तुझा धर्म नको सोडूस
कुठे जावे आम्ही ..कसा विझेल पोटाचा जाळ
कोरड्या मातीत कसा रुतेल विकासाचा फाळ
अपराध आमचे माफ कर ..नको दुरावा ठेवुस
माणूस चुकला म्हणून तू नको रे सूड घेवूस

...तुषार नातू !

शब्दांचे खेळ !


मुक्या भावनांचा गहिवर ....कधी कधी ..शब्दही रुसतात
मग मनाचे मळभ अनावर ...शब्द मात्र ..लपून बसतात 
सगळा गुंताडा..नात्यांचा ..बंधनांचा..शब्द छळत जातात 
शपथा वचने व्याकूळ आर्तता ..शब्द वाकुल्या दाखवतात 
मनाचा आरसा तडकून ..शब्द मनाशी लपंडाव खेळतात 
शब्द सोनेरी .शब्द दुहेरी ..शब्द काटेरी ...शब्द भांबावतात
शब्दच शत्रू ..शब्दच वैरी ..शब्दच मनाला निशब्द करतात 

....तुषार नातू !

बापाच्या जिवावर !



बापाच्या जिवावर मी खूप गमज्या केल्या 
टपोरी भाषेत सांगायचे तर.. अंगार मुतला 
मला माहित होते बाप आहेच निस्तरायला 
माझा रिकामा खिसा नेहमी गरम ठेवायला 

बाप होता पाठीशी कोर्टात जामीन द्यायला 
बाईकवर सुसाट गेलो की काळजी घ्यायला 
पोरीबाळींच्या भानगडीत पाठीशी घालायला 
कुलदीपक म्हणून मला कौतुकाने पहायला

चिडला कितीही तरी आतल्याआत कुढायला
आईच्या कडे पाहून मला संरक्षण द्यायला
पिवून घरी आलो तरीसुद्धा दुर्लक्ष करायला
पोरच आहे हे सारखे स्वतःला बजावायला

...तुषार नातू !

सुंदर लोचा !



सुंदर लोचा झालाय जिवनाचा.. कुठून येईल बळ 
मी .माझे ..मला चे युद्ध ...प्रज्ञेचे सुप्त आकर्षण 
आसक्तीच्या दावणीला बांधलेले... व्याकूळ मन 
भोगाला चटावलेल्या इंद्रियांना.....तृप्तीचे डोहाळे 
ऐहिक सार्थकतेची धडपड.. बुद्धीचे कुटील डावपेच 
आत्म्याच्या मुक्तीचे ऐतिहासिक धार्मिक दडपण 
अधूनमधून येणारी रेंगाळणारी...विरक्तीची उबळ 

...तुषार नातू !

मोबाईल !



तरुण मुलांच्या हातातील मोबाईल 
दुहेरी मारा करणारे छोटे मिसाईल 
आईबापाची वाढणार सारखी चिंता 
मुले करून ठेवणार काहीतरी गुंता 


सारखे मेसेज करून.. हसणे गोड 
मोबाईलचा मात्र ...सायलेंट मोड 
घरातले बोलणे तर कमी झालेले
इयरफोन वर मन .गाणे बनलेले

.....तुषार नातू !

विचारधारा !


हमारी लडाई विचारधारा की है असे म्हणत 
त्यांनी त्यांच्या भाषणाला तेज धार लावली 
त्यांच्या विचारांची धारा कोणती हेच शोधत 
मी उगाचच माझ्या डोक्याला कल्हई केली 

..तुषार नातू !

मनाचे रहस्य !



कधी वाटले मला समजले मनाचे सर्व रहस्य 
मनासारखे घडते तेव्हा ओठी उमलते हास्य 
मनाविरुद्ध झाले की बोचतात असंख्य काटे 
प्रत्येक गोष्टीला फुटत जातात अगणित फाटे 

मनाचा मागोवा घ्या नेटका सदोदित निरंतर 
कमी होईल तेव्हा दोन मनातील वाढते अंतर
भावना मनातल्या ..बसावे निवांत निरखत
शिवता येईल मनाला एक अभेद्य चिलखत

मन कधी स्वार्थी .कपटी ..घायाळ ..वैरागी
लाचार लोचट भोगी... कधी निर्मळ त्यागी
मनाच्या सुप्त छटा मनालाच करती सुन्न
मन सगळीकडे सारखेच माणसे जरी भिन्न

मनाला शांत ठेवा भावना जरी खूप अनावर
विचारांचा हल्ला होईल तरी रहा भानावर
मन बंडही करेल जेव्हा अंकुश लागेल त्यावर
मनाच्या मुसक्या बांधून राज्य करा मनावर

....तुषार नातू !