शनिवार, ७ जून, २०१४

हरलेले पालकत्व !


जन्म घेणाऱ्या बाळाची तब्येत तपासली
तुम्ही नियमित सोनोग्राफीच्या यंत्राद्वारे 
घरात कुलदीपक येणार म्हणून नाचलेही 
त्याच्या जन्मानंतर पेढे वाटले आनंदाने 

जन्मानंतर त्याला न्हाऊ माखू घालताना 
धन्य झाली आई अन बापाचे मास वाढले 
आकार घेत मोठा होत जाणारा गुणी बाळ 
हिंस्त्र लांडगा होतो की क्रूरकर्मी वन्य पशु

त्याच्यात एखादा सिद्धार्थ उदय पावतोय
अथवा छत्रपती , किमान सत्कर्मी मानव
या कडे लक्ष देण्यात मात्र तुम्ही हरलात
सपशेल पराभव हा तुमच्या पालकत्वाचा

तुमचा असलेला राजकुमार राजरोसपणे
अब्रू लुटतोय आता कोण्या आईबापाच्या
गोजिरवाण्या गोड अबला राजकुमारीची
नग्न फासावर देत जहाल तेजाब पाजून

त्याला चटक लागलीय करूण किंकाळ्या
ऐकण्याची अन शरीराचे लचके तोडण्याची
रक्तपिपासू हिंस्त्र जनावरे फिरत आहेत
हरलेल्या पालकांची आंधळ्या धृतराष्ट्रांची

राजकन्यांनो तुम्ही व्हा महिषासुर मर्दिनी
कठोर करा कोमल हृदय असुर दिसल्यावर
नरडीचा घोट घ्या बिनदिक्कत लांडग्यांचा
नाहीतर अपमानित होत रहा अबला बनून

..तुषार नातू !

( सर्वत्र माजलेल्या लांडग्यांना समर्पित )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा