शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

सर्वसामान्य !तू सर्वसामान्य आहेस ...अनेक बंधनात जखडलेला 
तुला पाच वर्षांनी मतदानाचा अधिकार दिला गेलाय 
तुझे लाख मोलाचे मत मातीमोल केलेच आम्ही जरी 
तरी तू जाब विचारायला पोचणार नाहीस अशी तरतुद

' चार लोक काय म्हणतील ' या भीतीतच जगावेस तू 
तरच तू कायदापालन करशील व बंडखोरी नाकारशील 
तुला वकील व कोर्टाच्या वा-या झेपणार नाहीत मुळी 
तू आपला सरळमार्गीच रहा देवावर सोपवून निर्धास्त

गल्लीतील गुंड ..नाक्यावरच्या टपोरींपासून लांबच रहा
आम्ही त्याला संरक्षण दिलेय आमचा कार्यकर्ता म्हणून
पोरीबाळींना छेडणा-या दुर्योधनांकडे दुर्लक्षच करत रहा
हे आम्हाला निवडणुकीत प्रचाराला मदत करतात बरे

पोलीस ..लाचखावू कर्मचारी हे तुझ्यातले असले तरी
त्यांना आम्ही बांधूनच ठेवलेय आमचे नोकर म्हणून
ते तुझी बाजू घेण्याची शक्यता अजिबात धरू नकोस
तू तुझ्या जातीशी ..धर्माशी संस्कृतीशी इमान बाळग

दर पाच वर्षांनी आम्ही तुला वेगवेगळी लालूच दाखवू
तेव्हा नेहमीप्रमाणे तू बुद्धी गहाण ठेवून मतदान कर
पोट ..पोरेबाळे ..संसार ..यांच्याशी बांधील राहूनच तू
आपला मौल्यवान जन्म कामी लाव तरच भले होईल

बाकी सगळे ईश्वरावर सोपव नाहीतर एखाद्या बुवाच्या
बाबाच्या चरणी अर्पण कर .तीर्थस्थळी गाऱ्हाणे मांड तुझे
बंडखोरीला नक्सलवादी माओवादी मानून आम्ही तुला
मजबूर करू हिंसेसाठी मग तुला गोळ्याही घालू बेधडक !

...तुषार नातू !

रणांगण !नाक्यावरचा चहावाला ...सध्या भलताच फार्मात आलाय 
चेहऱ्यावर मार्दव आणि ...बोलण्यात साखर पेरू लागलाय 
कडक चहा प्रमाणे टीका करत ...भलताच तल्लख झालाय 

पंचतारांकित संस्कृतीतील पप्पुही ...आताशा बावचळलाय 
' मै नही हम ' म्हणत .....पायी फिरून युवराज दमलाय 
राज्याभिषेकाची स्वप्ने बाळगून...... मनोमनी हरखलाय 

गुंडांचा बादशहा कधीचाच ...तिसरा मोर्चा खोलून बसलाय
हत्तीला गोंजारून .. विळा हातोड्याला धार लावून थकलाय
निधर्मीवादाचा झेंडा घेवून ...सायकल वरून पळत सुटलाय

कृषी प्रदर्शनाने धन्य होऊन... साहेबही मैदानात उतरलाय
जोडतोडीचा सम्राट पुन्हा...तिजोरी उघडून सज्ज झालाय
आता डाव जमायलाच हवा म्हणूत.. मेंदू पणाला लावलाय

मफलर टोपी घालून.. ' आम आदमी ' मात्र नडून राहिलाय
मोठ्या मोठ्या धेंडाना धूळ चाखायची ..हूल देवून चुकलाय
त्रिशंकू लोकसभेला आमंत्रण देवून ...आरोप करत सूटलाय

......तुषार नातू !

सावध हरिणी ..सावध ग !सोनेरी जाळे .. घेवूनी फिरती..तलाश त्यांना शिकारीची 
शब्द प्रेमाचे .. इरादे नापाक ..असे अनेक मजनू असती 

कपडे आकर्षक ..दुचाकी चारचाकी ..सोयही हॉटेलींगची 
भुलशील तू ..मोहरशील तू ..इथे अनेक बुरखे असती 

समर्पणाची स्वप्ने ..प्रेम भावना तुझी ..आस संसाराची
त्यांना हवे शरीर फक्त ...आज लांडगे शहरभर फिरती 

भुलू नको ..चळू नको ...शपथ आईबापाच्या विश्वासाची
योग्य अयोग्य तर्क ठेव मनी..ओळखून रहा फसवी नीती

..तुषार नातू ! ( १४ फेब्रुवारी ..व्हेलेंटाईन डे )

रविवार, ९ फेब्रुवारी, २०१४

भ्रष्टाचार !मिळेल तेथून मिळेल तेव्हा 
काही बाही खातच जावे 
मागून खावे ...चोरून खावे 
अगदीच नाही तर ..ओरबाडून घ्यावे 
पण मिळेल तेथून मिळेल तेव्हा ...........!

लाचार व्हावे ... पाय धरावे 
नाहीच जमले तर पाय ओढावे 
उताणे पडावे ....उरावर बसावे
कमरेच्या लंगोटीलाही झटावे
पण मिळेल तेथून...........!

उघडकीस आले तर
समाजबांधवांचे मेळे भरवावे
अन्याय म्हणत बोंबलावे
कट झालाय असे सांगावे
पण मिळेल तेथून ..........!

काही दिवस जेल मध्ये जावे
राजेशाही थाटात आराम करावा
चौकशी यंत्रणांना पैसे चारावे
न्यायालयात निर्दोष व्हावे
पण मिळेल तेथून ...

...तुषार नातू !

बुधवार, ५ फेब्रुवारी, २०१४

विसरायला हवा !

आयुष्यातल्या पहिल्या पेग ने दिलेला
उन्मादाचा ..सर्वशक्तिमान पणाचा
समस्या संपल्याचा ...मनमोकळी 
दाद देण्याचा ..तरल प्रतिभेचा 
तो अनुभव विसरायला हवा 

अर्थहीन वांझोटे तत्वज्ञान पाजळण्याचा
सारे चुटकीसरशी होईलच वाटण्याचा 
मेंदूला झिणझिण्या आणण्याचा
बुद्धीच्या कक्षा चौफेर होण्याचा
तो अनुभव विसरायला हवा

विनोदबुद्धीच्या फटकेबाजीचा..षटकारांचा
काटेरी ताशेरे ....फटकळ जबाबांचा
किसीसे भी नही डरते भासण्याचा
सर्व बाबतीतील तज्ञ झाल्याचा
तो अनुभव विसरायलाच हवा

आठवायला हवेत मला कुटुंबियांचे चेहरे
व्यर्थ गेलेले कोणाचे कष्टाचे पैसे
जिवनाबद्दलची उदात्त स्वप्ने
तुटणारे ते आईचे काळीज
पत्नीचे क्षणोक्षणी झुरणे
मुलांचे भविष्य उभारणे....

...तुषार नातू ! ( ४ फेब्रुवारी २०१४ )

राहूनच गेले....!

राहूनच गेले ...डोळ्यात रोखून पाहून 
' कशी आहेस ' असे हळुवार विचारणे 
तुझा आनंदाचा बुरखा उचलून पहाणे 

राहूनच गेले...तुझी क्षमायाचना करून 
तुला सोनेरी भूतकाळाची आठवण देणे 
थरथरत्या पापण्या डोळे भरून पहाणे 

राहूनच गेले माझी तडफड तुला सांगून
व्याकुळता भेटीची तुझ्यापर्यंत पोचवणे
तुझ्या मनी आठवणींचे मोहोळ उठवणे

राहूनच गेले ...
राहूनच गेले मनातून तुझे नाव पुसून
हृदयातील कप्पा कायमचा बंद करणे
झाले गेले गंगेला म्हणत तटस्थ होणे

....तुषार नातू ! ( ४ फेब्रु २०१४ )

मायबाप नेते हो !


मी सोडून दिलीय , मुलाच्या शिक्षणाची चिंता 
कारण नैतिकता कधीच हरवलीय शिक्षणातून 
मी सोडून दिलीय ,त्याच्या नोकरीची चिंता 
चोच आणि चाऱ्याचे गणित तो शिकेलच 

मला चिंता आहे त्याच्या हळव्या मनाची 
खूप भाबडा आहे तो , नागरिक शास्त्र 
शिकताना, सरकार म्हणजेच तारणहार 
असा समज करून दिलाय तुम्ही त्याचा

सर्वोच्च संसद म्हणजे देशाच्या जनतेची
देशाच्या सुरक्षेची देखभाल करणारी प्रणाली
हा त्याचा समज कृपया तसाच ठेवा नाहीतर
तो कोलमडून जाईल हो , त्याला जपा

तुमचे ' आधार कार्ड ' न त्याच्या सवलती
देखील नका देऊ हवेतर त्याला पण किमान
तुम्ही लबाड आहात हे कधीच कळू देऊ नका
त्याची खूप श्रद्धा आहे , संसद प्रणालीवर

सारे भारतीय माझे देशबांधव आहेत हे
तुम्ही रोज म्हणून घेता त्याच्या कडून
त्याला कधीच समजू देऊ नका की तुम्ही
या बांधवाना जाती धर्मात विभागलेय ते

'जण गण मन ' , म्हणताना तो ताठ मानेने
उभा राहून सलाम करतो ' जय ' म्हणून
त्याला कळता कामा नये तुमचे प्रांत वादाचे
राजकीय गणित , तो तुटेल हो आतूनच

श्रम , समानता , बंधुभाव , न्याय ,
प्रामाणीकपणा , सेवा , हे सगळे तो
तुमच्या भाषणात ऐकतोय सध्या ते
तसेच अनुभवास आणून द्या तुम्ही

मायबाप सरकार हवे तर सबसिडी चे
सिलेंडर देऊ नका मला , हवे तर अजून
भरघोस महागाई वाढू द्या पण ..पण
तेव्हढे माझ्या पोराचे मात्र विसरू नका !

................तुषार नातू !

शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

रंगीत औषध !बाबा तुमचे ते रंगीत औषध ..मलाही एकदा घ्यायचे आहे 
घेवून औषध माझे टेन्शन ..एकदा मलाही पळवायचे आहे 
मित्रांसोबत माझ्या मलाही .औषधपार्टी साठी जायचे आहे 
ग्लास हातात घेवून मोठ्याने चिअर्स असे म्हणायचे आहे 

तुम्ही सांगता ते औषध कडू ..खरे खोटे पडताळायचे आहे 
कडू औषध घेतानाही चिअर्स का म्हणता तेच पहायचे आहे 
औषध घेवून तुमच्यासारखेच सगळ्यांशी भांडायचे आहे 
तुमच्यासारखेच बाणेदारपणे ' हु केअर्स ' हे म्हणायचे आहे

मोठ्याने ओरडून सर्वानाच एकदम चिडीचूप करायचे आहे
रागारागाने जेवणाचे ताट मलासुद्धा उधळून लावायचे आहे
' तुझी गरज नाही ' असे आईला ठणकावून सांगायचे आहे
आजोबांच्याही डोळ्याला .....डोळा भिडवून बोलायचे आहे

तुम्हाला हे औषध ...घ्यायला सांगणाऱ्याला भेटायचे आहे
तो मला भेटला की त्याला .. ..चांगलेच खड्सावायचे आहे
औषध कडू ..इतके महाग.. का सुचवलेस विचारायचे आहे
बाबा तुमचे ते रंगीत औषध ...मलाही एकदा घ्यायचे आहे

...तुषार नातू ! ( ३० जाने .२०१४ . )

टेन्शन ....टेन्शन !टेन्शन ....टेन्शन...म्हणजे.. आहे तरी काय ?
समस्यांचा बागुलबुवा की वास्तवाला 
फुटलेले कल्पनांचे पाय ....

विचारांचा गुंता ...भावनांची सरमिसळ 
क्षमतांचा पोबारा की भीतीचा गुब्बारा 
शक्कर कम कडक चाय ....

परिस्थितीचा पेच..हो ..नाही.. ची रस्सीखेच
तळ्यात...मळ्यात ..चिंतेच्या जाळ्यात
गार चहावरची नकोशी साय ....

पायाखालची सरकती वाळू ..ठसठसते गळू
संकटांचा मारा की बिनमौसमी गारा
व्याकूळ हंबरणारी गाय ......

टेन्शनचा निचरा ..काढून टाका मनीचा कचरा
दीर्घ श्वास घेवून ..दम धरा जरा
विश्वास जर तुमचा ठाम हाय ....

जिवनाची हीच मजा ..मीठा विना जेवण सजा
बुद्धीची कसोटी ...श्रमांची हातोटी
टेन्शनचे हो विशेष काय ?

हातपाय कामाला लावा ...श्रद्धा मनी ठेवा
विचार कमी ...काम जास्त
मगच टेन्शन पळून जाय !

.....तुषार नातू !( २९ जाने .२०१४ )

जयहिंद ! ! !


' मेरे देश की धरती ' ऐकले की मग 
कितीही मरगळ असली मनाला तरी
मन अभिमानाने ...भारतमातेच्या 
संग्रामात बलिदान केलेल्या वीरांच्या 
आठवणीने उभारी घेते...सज्ज होते 
नव्या स्वातंत्र्य संग्रामासाठी नव्याने 

' कर चले हम विदा ' चा करुण संदेश 
याद करून देत असतो... सदोदित
माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी
घेत असलेल्या श्वासासाठी सीमेवर
धारातीर्थी होण्यास सज्ज जवानांची
त्यांच्या व्याकूळ ..धन्य कुटुंबियांची

' रंग दे बसंती चोला ' चा रक्तरंग
घरादाराची राखरांगोळी करणाऱ्या
क्रांतीकारकांच्या घरातील काळोख
जालीयानवाला बागेतल्या निघृण
नरसंहार.. माझे रक्त उकळवतोच
ताठ मानेने मी तिरंग्याकडे पाहतो

' जयोस्तुते ' च्या त्या समरस्वराने
संमोहित होऊन मी घराबाहेर पडतो
मुलाचे बोट धरून त्याला सांगतो
तीन रंगांची महती ...अशोकचक्राचे
साम्राज्यपूर्ण वैराग्य आपोआप मग
माझ्या ओठातून ' जयहिंद उमटते !

...तुषार नातू !