शुक्रवार, २२ नोव्हेंबर, २०१३

गंदी बात

भ्रष्टाचारी सारे करून सावरून नामानिराळे 
काहीही न करता स्टिंग झालेले इथे बदनाम 

' आप ' च्या मागे हात धुवून लागले कावळे 
अण्णांचा गोंधळ उडवून साधले त्यांनी काम 

गंदी बात ..गंदी..गंदी ..गंदी ..गंदी बात !

..तुषार नातू

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०१३

दाग अच्छे है !

 कही दाग ना लाग जाये ' चा जमाना गेला 
' दाग अच्छे है ' चा आता बोलबाला झाला 
इलेक्शनच्या काळात दागांनाही भाव आला 
दागींच्या नात्यात तिकिटाचा चान्स मिळाला 

एकमेकांच्या दागाबद्दलच्या चर्चेला उत आला
दागांचे कोलीत घेवून वस्त्रहरणचा खेळ रंगला 
' साजीश है ' वाक्याने निर्लज्जपणाही शरमला 
मिडीयाच्या खेळालाही आयताच मुद्दा लाभला

दागपुराणांनी जनतेचा टाईमपास मस्त झाला
गंदी राजनीती है म्हणत दागी मात्र निश्चिंतला
दागांच्या शोधासाठी कार्यकर्ता जागरूक झाला
संपत्तीचे अन वासनांचे दाग ..देशच डागाळला

दाग धोनेका तरीका म्हणून धूर्तपणा बोकाळला
नवनवीन दाग लावण्यास चिखल गोळा केला
सावधान मतदारानो राहा दागांपासून सावधान
मत देतानाही सर्वांनी ठेवा लोकशाहीचेच भान

........ तुषार नातू !

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

.........

नुकताच कुठतरी म्हणे 
गांधींच्या चरख्याचा लिलाव झाला ..
विचार मातीमोल झाले 
मात्र चरख्याला चांगलाच भाव आला .

उठता बसता नाव घेणारे 
लिलावात कुठे दिसलेच नाहीत कुणाला 
त्यांच्या तत्वांची ग्वाही देणाऱ्या 
निवडून येणाऱ्यांचा पत्ता नाहीच लागला 

शाळा , रस्ते , चौक , पुतळे
इतके सर्व काही केलेय त्यांच्या स्मरणाला
विचार आणि तत्वांचे
छान भरीत केलेय निवडणुकीत वाढायला

अहिंसा ..सहिष्णुता ..
मस्तच लागते कधी तोंडी लावायला
चरखा घेवून काय कप्पाळ
उगाच अडचण होईल घरात ..पक्षात !- तुषार नातू

शिकारी सज्ज झालेत !

शिकारी सज्ज झालेत 
मतांची पाखरे जाळ्यात अडकवायला 
आश्वासनांचा भुलभुलैया
समृद्धीच्या स्वप्नात आम्हां रमवायला 

शर्टच्या बाह्या सरसावून 
बलिदानांचे गोडवे गाऊन चकवायला
रोजगार हमीचा नरेगा 
RTI चे उसने पक्वान्न ताटात द्यायला

तोंडात सोन्याचा चमचा
पायाशी लोचट कुत्र्यांचा लाचार गोतावळा
उपाशी कुपोषित पोटांना
पुन्हा पाच वर्षे ओलीस म्हणून बांधायला

FDI ची परकीय सत्ता
अन्न सुरक्षा बिल स्वत:ची पाठ थोपटायला
आम आदमीच्या गोष्टी
स्विस बँकेत करोडोंची माया जमवायला

2G..कोलगेटला बगल
लोकपाल विधेयक कायमचे संपवायला
सर्वधर्म समभाव
आरक्षणाचे तुकडे जनतेत स्वैर फेकायला

--------तुषार नातू !

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

मुखवटा

मी समानतेच्या मापाचा एक छानसा मुखवटा 
शिवून घेतलाय ..सार्वजनिक ठिकाणी तर 
हा मुखवटा आठवणीने सोबत नेत असतो मी 

सर्वधर्मसमभाव .एकता ..महिलांचे स्वातंत्र्य 
देशप्रेम ...घटनेची अस्मिता ..समान न्याय
भ्रष्टाचार ..अन्याय ..इतरांची सारी सोंगेढोंगे 
वगैरे सगळे व्यवस्थित वठवतो मी बेमालूम

माझ्या बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ..महात्मा फुले तर
हमखास असतातच.. प्रस्थापित ..भांडवलदार
शासक व शोषक यातील नेमका फरक देखील
छान समजावून सांगतो..मी तरुण पोरांना

त्यांनी पेटून उठावे याची नीट दखल घेतो मी
काय करणार ? सध्या या सगळ्याचीच चलती
आहे म्हणे ..हे असेच वागावे हेच बरे असते
माझ्या मात्र घरी बजावून ठेवलेय सगळ्यांना
वार्निंगच दिलीय माझ्या सर्व पोरी बाळींना
खबरदार जातीबाहेर ..आणि त्यातल्या त्यात

खालच्या जातीशी लग्न केले तर मी तंगड्याच
तोडीन याचीही स्पष्ट जाणीव दिलीय त्यांना
परक्या समोर ..डोक्यावरचा पदर ढळू नये
याची दक्षताही घेतातच माझ्या सौभाग्यवती
माझी सगळी बडदास्त ठेवतात त्या नेहमीच
तसा दराराच ठेवलाय मी घरी ..काय करणार
म्हणतात ना ..पायातली वहाण पायातच बरी !

तुषार नातू !