शनिवार, २९ मार्च, २०१४

भुते जागतात मनात

रात्र येताच भुते जागतात मनात 
भयाण एकांताचा गोंगाट टिपेला 
अधुऱ्या स्वप्नांचा कलकलाट 
अदृश्य मायावी मोहजाल
पलंगावर मी बदहाल 

रात्र अशी शिक्षा झोपेसाठी भिक्षा 
रुंदावलेल्या कक्षा अतृप्तीच्या
पापण्यातला थेंब दुराव्याचा
निद्रेच्या कुशीतही परका
मी मलाही पारखा

रात्र उधाणलेल्या तप्त उसास्यांची
खोल सुस्कारे नसानसात वारे
वैफल्याचे चंद्रतारे ऐन भरात
आकांक्षांचे उध्वस्त देव्हारे
जड श्वासात अंगारे

..तुषार नातू !

माझा सेक्युलरीझम !मी मुळचा कट्टर मानवतावादी आहे 
एका मानवाने दुसऱ्या मानवाशी 
प्रेमाने वागावे ..त्यांच्या भावनांची 
योग्य कदर करावी ..कुणीही कुणाला 
दुखावू नये याच मताचा ...

माझा जन्म ज्या दवाखान्यात झाला 
त्या डॉक्टरची जात..नर्सची जात 
जाणून घेण्यात मला रस नाही
शाळेत मला शिकवणाऱ्या
गुरुजनांची जात माझ्या साठी
महत्वाची नाही ..

मला कोणी त्रास दिला ..दुखावले
तरीही मी त्याची जात कोणती
धर्म कोणता याची विचार करत नाही
मात्र ती विशिष्ट व्यक्ती
चांगली मानव नाही असा
निष्कर्ष काढतो ..

माझ्या धर्मात ..माझ्या जातीत तसेच
समाजातही अनेकविध गोष्टी , प्रथा
वर्तमान काळाशी सुसंगत नाहीत
हे जाणून मी ते बदलण्याचा
अट्टाहास न धरता ..मला स्वतःला
वर्तमानाशी जोडून ठेवण्याचा
प्रत्यत्न करत असतो .

इतर धर्मांची .अथवा जातींची टीकात्मक
चिकित्सा करणे मला आवडत नाही
त्या ऐवजी..लोकांना संकटात मदत
करता आली तरच मी खरा माणूस
असे वाटून मी तसेच नेहमी करतो
मन:शांती साठी तेच योग्य आहे

मी श्रेष्ठ ..माझी जात ..धर्म श्रेष्ठ
असे नेहमी वाटणे ही अमानवी
इतर मानवांना कमी लेखणारी
विकृती आहे असा माझा ठाम
समज आहे .

माझे इतिहास संशोधन कधीही
द्वेषमुलक प्रवृत्तीने नसते तर
मानवी वृत्ती तसेच मानवी भावना
या बाबत जाणून घेण्याची तीव्र
' जिज्ञासा ' असते आणि त्यातून
मला चांगला माणूस बनण्यास
प्रेरणा ..मदत मिळते

' मानवसेवा हीच ईश्वर सेवा '
' जगा आणि जगू द्या '
' सर्वांचे कल्याण होवो '
' दुरितांचे तिमिर जावो '
अशी सर्वांचे हित साधणारी
बोधवाक्ये मला आवडतात

......तुषार नातू !

गुरुवार, २७ मार्च, २०१४

लालूचे दुखः

लालूचे दुखः ....टी.व्ही वर पाहून....पोटभर हसलो 
त्त्वांच्या मोठ्या गप्पा ...मारताना पाहून त्याला 
मनातच संतापलो ...

देश बचावो मोदी हटावो ..बिहार बचावो नितीश हटावो 
नवीन नारा त्याचा मोठाच न्यारा ...पाहून त्याचा तोरा 
मनातच उद्रेकलो ...

समोरून आली मरतुकडी गाय ..सोबत तसेच वासरू 
चारा मिळेना त्यांना म्हणून लागले ..मोठ्याने हंबरू 
लालू ऐवजी मीच शरमलो !..

..तुषार नातू !

' विश्वंभर '

नवीन ओळख झाल्यावर ...त्याने मला नाव विचारले 
माझ्या फक्त ... मानवी देहाचे नाव सांगितले त्याला 
त्याचे समाधान झाले नाही ..आडनाव सांगा म्हणाला 
' विश्वंभर ' असे सांगूनही .... तो तसाच प्रश्नांकित 

त्याला हवी होती माहिती माझ्या कुळाची......मुळाची
कदाचित त्यावरच ठरणार होते ...या मैत्रीचे भवितव्य 
साहजिकच होते म्हणा ते ..कुत्री ..मांजरी पाळतानाही
त्यांच्या सात पिढ्यांची माहिती काढतोच की माणूस 

म्हणजे आडनावावरून ...माझी लायकी ठरणार तर
त्याला विचारांशी काही घेणे नव्हते जात पटली तरच
आमच्या घट्ट मैत्रीचे भवितव्य सुरक्षित असणार होते
मी एक मानव आहे ही माहिती तशी त्रोटकच होती की

मला माहित होते आडनाव सांगितले की तो तपासेल
त्याच्या दृष्टीकोनातून मला ..माझ्या नितीमत्तेला
माझ्या पुर्वजांवरून माझी परीक्षा होईल.. ज्यांना मी
कधी पहिलेही नव्हते..त्यावरूनच तो मला जोखणार

शेवटी मी आडनाव सांगितल्यावर मनातल्या मनात
तो ' वाटलंच ' असे पुटपुटला हे ऐकूनही मी निर्विकार
हे जाणवले तो जरा हात राखूनच बोलतोय माझ्याशी
त्याने तो पुरोगामी विचारांचा असल्याचेही सांगितले

इतिहासात तो अतिशय हुशार आहे हे पण जाणवले
फक्त आमचा दोघांचाही वर्तमान मात्र ठीक नव्हता
भविष्यही अधांतरीच होते आमच्या मैत्रीचे ..कारण
आम्ही दोघेही ...जखमा कुरवाळण्यात पटाईत होतो

आमच्या मनावर ..अनेक ऐतिहासिक ..सामाजिक
व्रण होते ......दोन माणसांमधील कधीच न संपणारे
अंतरच होते ते ..दोघेही विव्हळ होतो तरीही आम्ही
कुळाशी इमान राखणारे ....जातीसाठी माती खाणारे

...तुषार नातू

बाल्कनीतला झाडू !बाल्कनीच्या कोपऱ्यात ठेवलेला झाडू 
घराच्या मुख्य दिवाणखान्यात आला 
दिमाखाने मोठ्या सगळीकडे फिरला 
सारी स्वच्छता झाली पाहिजे म्हणत 
सर्वांवर आवेशाने डाफरला...ओरडला 

घरभर लुडबुड करत सर्वांशी भांडला 
क्रांती झाली पाहिजे ठासून बोलला 
मीच घराचा कर्ता असे तो बडबडला
वल्गना करत सोफ्यावर विसावला
तेथेच लोळला न असंबद्ध बरळला

घरमालक बिचारा स्तब्ध झालेला
झाडूच्या आवेशाला तो बिचकलेला
घर स्वच्छ होईल म्हणून भूललेला
सुंदर घर कल्पनेने तो हुरळलेला
झाडूलाच प्राधान्य देवू हे ठरवलेला

झाडू शेवटी त्याच्या मूळपदी आला
एकेक काडी वेगळी होऊन विखुरला
विस्कळीत झाला आणि सैल पडला
चार काड्या उरून केविलवाणा झाला
कसातरी खुरडत बाल्कनीतच गेला

...तुषार नातू !

मायेचे जाळे

थिजलेल्या भावनांचा बर्फ वितळवणारे शब्द 
शोधतोय मी वाळवंटात एखादे लावण्य मुग्ध 

ऋतूंचक्रात हरवलेली उबदार स्नेहाची दुलई 
गात्रागात्रात भिनलेली रेशीम स्वप्न झिलई 

उन्मत्तपणे भिरकावून दिलेले मायेचे जाळे
फास बनलेत माझ्याच साठी माझेच डोहाळे 

...तुषार नातू

मनच माझे पाखंडी

मनच माझे पाखंडी ..मनच घेवून जाते तोफेच्या तोंडी 
कधी शेवाळलेले बुळबुळीत कधी एकदम मिळमिळीत 
हमखास दगा देणारे.. ठरते कधी उंच अवकाशात नेणारे 
असतात कधी कोरडे उमाळे ..कधी संततधार पावसाळे 

मनाच्या ऋतूंचे विस्मयगणित सुटले नाही कधीच मला 
मनानेच घात केला ..मनाचाच देवदूत सुटकेला धावला 
कधी सुंदर रंगीत फुले कधी काटेरी बाभूळबन मन झाले 
मोरपिसांचे स्पर्शशहारे.. धगधगीत तप्त होरपळ इशारे 

मन आरसा लख्ख तर कधी पाण्यातले अधुरे प्रतिबिंब
मनच उदास भरलेले आभाळ ..कधी अद्भूतसे मायाजाळ
हिशेब मनाचा क्षणोक्षणी घ्यावा करेल जरी खूप कांगावा
मनाच्या चाबकाने मन मारावे मनानेच मनाला गोंजारावे

...तुषार नातू !