शनिवार, २६ एप्रिल, २०१४

काळाची हिशेबवही !

काळाची हिशेबवही !

पत्रिका दाखवत ..विविध प्रकारच्या अंगठ्या 
खडे ...माळा घालून स्वतःला सुरक्षित करतो 

जमेल तसे प्रत्येक तीर्थस्थानाला भेटही देतो 
मंदिर मस्जिद चर्च पुढे हळूच माथा झुकवतो 

धर्मस्थळाच्या दानपेटीत पैसे देखील टाकतो 
अभिमानाने मग स्वतःचीच पाठही थोपटतो 

ही अशी सुरक्षा कवचे पांघरून निवांत झोपतो
अन मी निर्भय होतो माझ्या नित्य कर्मासाठी

दिवसभर मग मी माझ्या मनाचा राजा असतो
पैसा मिळवण्यासाठी मी वाट्टेल तसे धंदे करतो

अधिकार गाजवत सर्वांवर मी उन्मत्त जगतो
माझ्या कर्तुत्वाचे सगळीकडे गोडवे मीच गातो

स्वार्थाच्या आड येणाऱ्यांची विल्हेवाट लावतो
कुटील असे क्रूर डाव नेहमीच .. योजून ठेवतो

काळ माझा मात्र सगळे मूकपणे पाहत असतो
माझ्या नकळत तो माझा हिशोब नीटच ठेवतो

वेळ येताच तो आपला फासा नेमकाच टाकतो
मी तडफडतो ..चडफडतो..सगळ्या शक्तीनिशी

शेवटी असहाय अन हतबल होतो शरण जातो
वेळ गेलेली ..काळाचीही हिशोबवही भरलेली

....तुषार नातू !

कधी कधी

कधी कधी

संतापाचा ज्वालामुखी जागृत होतोच कधी कधी
जगण्यासाठी पांघरलेले बुरखे सगळे सोलवटून 
जिभ बंदूक ..शब्दांचे उकिरडे होतात कधी कधी

मी उघडानागडा वैशाख वणवा असतो कधी कधी
असहाय..लाचार ..होऊन मी पचवतो दंश सगळे 
शेपूट हलवून कुत्रा होऊन पोट बघतो कधी कधी

वैतागून घरात...स्वतःला चिणून घेतो कधी कधी
बायको अन पोरगा यांची चिंता करत नाईलाजाने
जिवंत प्रेतावर संसाराचे कफन टाकतो कधी कधी

मनात माझ्या अमावस्या पेरतो मीच कधी कधी
नव्या दिवसाच्या लढाईला ..तयार होऊन सजून
माझे प्रेत खांद्यावर घेवून मी चालतो कधी कधी

...तुषार नातू !

शुक्रवार, २५ एप्रिल, २०१४

उसन्या श्वासांवर !उसन्या श्वासांवर ..विलंबित आश्वासनांवर 
मनाचा वारू ....स्वप्नभंगाच्या हिंदोळ्यांवर 
इतिहासजमा संदर्भ ..वर्तमानाच्या ऐरणीवर 
काळोखाची सावली ..उगवतीच्या भविष्यावर 

सोबती सारे निश्चिंत ..हृदयाच्या ठोक्यांवर 
अखंड एकलकोंडे ..विरहस्त मन काट्यांवर 
अज्ञाताचा बागुलबुवा ..सततचा पहाऱ्यावर
दबा धरून जहरी नाग ..ओळखीच्या वाटेवर

...तुषार नातू !

हक्काचा वार !शनिवार त्याच्या पिण्याचा हक्काचा वार असतो 
आठवडाभर कष्ट मग हा दिवस निवांत मिळतो 
तिच्या स्वप्नांचा मात्र हाच एक घातवार ठरतो 
तो घरी येईपर्यंत तिचा जीव टांगणीला लागतो 

हल्ली प्यायल्यावर ..त्याचा तोल देखील जातो 
तोंडातील अभद्र शिव्यांनी तिचा जीव धस्तावतो 
तिचा पडलेला चेहरा पाहून तो नेहमी कातावतो
काय कमी आहे तुला ...म्हणून जोराने ओरडतो

पूर्वी मात्र शनिवारी ती खूपच आनंदी असायची
फिरायला जायचे म्हणून नटून थटून बसायची
कधी काळी पितो म्हणून पापड भाजून द्यायची
त्याने चिअर्स केल्यावर ती कौतुकाने पहायची

आताशा फिरायला जायचा त्याचा मुडच नसतो
रात्री उशिरापर्यंत तो ...मस्त मित्रांमध्ये रमतो
ती मुलांना पोटाशी धरून बाल्कनीत उभी असते
त्याच्या येण्याच्या वाटेवर नजर अंथरून बसते

..तुषार नातू !

' सच आॅन करो '

' सच आॅन करो '

' सच को आॅन करो ' ..सच को वोट दो....असे सांगत 
त्यांनी मला सगळी ' सत्ये ' शोधण्यास ..भाग पाडले 

मी स्वातंत्र्यसंग्रामा पासूनच्या घटना वेचत राहिलो 
सत्य शोधत गेलो तसा अधिक स्फोटक बनत गेलो 
फाळणीनंतरचे रक्तलांच्छित सत्य शोधून गहिवरलो 
पाकिस्तानच्या जन्माचे सत्य पाहून मनोमन पेटलो 

चाचाजींचे गुलाब फुल सत्याला पडलेली गोड भूल
शास्त्रीजींच्या मृत्यूचे रहस्य ...मनामनातील शूल
तेव्हापासूनच सर्वधर्म समभावाचे हे लाडके कोकरू
गरिबी हटाओ म्हणत हंबरणारे गोंडस गाय -वासरू

आणीबाणीचे क्रूर अस्त्र ..लोकशाहीचे फेडलेले वस्त्र
सत्तेचे कुटील डावपेच न सत्याला लागलेली ठेच
बोफोर्स तोफांचा स्फोट ..सत्याचा झालेला विस्कोट
पंचाहत्तर वर्षे सत्य गहाण ..खुर्चीची अखंड तहान

सत्य कोळशात बरबटलेले..मंत्रालयात जाळलेले
साखर कारखान्यात लपलेले ..धरणात मुतलेले
चारा खाण्यात गुंतलेले सत्तेसाठी लाचार झालेले
समाजवादाने घेरलेले ..गुंडगिरीने घाबरून गेलेले

अण्णांच्या आंदोलनात जमलेले नंतर गांगरलेले
स्विस बँकेत दडलेले ...जावयाच्या घरी धाडलेले
रामदेवबाबांवर सोडलेले ..मध्यरात्री हल्ला केलेले
सत्य असत्याला घाबरलेले बिचारे आता अर्धमेले

.....तुषार नातू !

गुरुवार, १७ एप्रिल, २०१४

पाखंडी !

पाखंडी !

मन माझे पाखंडी ..विकारांची दहीहंडी 
मन मोठे लबाड ..शोधत राही घबाड 
मन आहे बेईमान ...बेगडी कमान 
मना सावध रहा ..स्वतःकडे पहा 
मन विषण्ण ...उगाचच खिन्न 
मन भरारी ...सोडेल पायरी 
मन आनंदी ..ब्रम्हानंदी 
मन चोर..मन मोर 
मन वर्तनाचे सार
मन आधार
मन भार

...तुषार नातू !

शनिवार, १२ एप्रिल, २०१४

देशभक्तीचा फंडा ..लोकशाहीची हागणदरी !

देशभक्तीचा फंडा ..लोकशाहीची हागणदरी !

निवडणुकीच्या रणधुमाळीत ....आचारसंहितेचा बोलबाला 
संत ..मौलानाही ..मैदानात ..धर्मनिरपेक्षतेचा खून झाला 
काटो ..मारो ..इंतकाम लो..धर्मच आता लावलेत पणाला
गोध्रा..मुजफ्फरनगरची..रक्तपिपासू भुते आली कामाला 

परकीय शक्तींचा अदृश्य हात ..देशभक्तीचा नवीनच फंडा
आमचीच निष्ठा सर्वश्रेष्ठ ..उंच धरा सर्वानी आमचा झेंडा 
भरलीय सत्तेची लूत..लोककल्याण हा तर खोटाच अजेंडा 
पाकिस्तान ..चीन ..अमेरिकेचा...एकदा तरी हिशोब मांडा

महागाई ..भ्रष्टाचार ..बेरोजगारी ..हे सारे मुद्दे बिनपगारी
जात कोणती ..धर्म कोणता ..यांचीच तर सारी मक्तेदारी
शहीद जवानांना तिलांजली ..खुर्चीची निर्लज्ज हाणामारी
बिथरलेली तरुणाई ..दारूचाही पूर..लोकशाहीची हागणदरी

...तुषार नातू !

अभी नही तो कभी नही !तथाकथित सेक्युलर नेत्यांचे विषारी फुत्कार 
त्यांच्या गुंड चेल्यांचे विकृत उन्मादी चित्कार 
जागोजागी नाक्यानाक्यावर नोटांचेच सत्कार 
सर्वासामान्यांच्या नशिबी तर नेहमीचे धुत्कार 

टगे ..भ्रष्टाचारी ...बाहुबलींचाही जयजयकार 
गुंड ..स्मगलर ..जमीन माफियाही चालणार 
धार्मिकतेचे चोचले म्हणे देश खड्ड्यात नेणार
धर्म बुडवा..देश वाचवा हाच नारा आम्ही देणार

खाजगीत मात्र जाती पातींचे हिशोब करणार
धार्मिक गणितेही तेव्हाच हिरीरीने मांडणार
घरी आरती करून नंतर गोल टोपी घालणार
निवडणुकीनंतर काही तर हा देशही सोडणार

मंदिर मशिदीतला धर्म चव्हाट्यावर आलाय
धार्मिकतेचा कढ येवून देशही उकळू लागलाय
स्विस बँकेतला आपला पैसाही संपत आलाय
अभी नही तो कभी नही.जीव पणाला लागलाय

...तुषार नातू !

क्षितीजगस्त !विचारांचा अथक प्रवास मैलो न मैल 
शक्यतांच्या क्षितिजावरील काकदृष्टी 
कान आतुर श्वासांच्या शुभावार्तेसाठी 

स्वप्नाच्या गावांचेही वांझोटे पुनर्वसन 
दाही दिशांना हादरवणारा तृषार्त टाहो
डोळ्यांची भिरभिरणारी विध्द पाखरे 

कोणती ही क्षुधा ..मी नेहमीच द्विधा !

...तुषार नातू !

अँक्सिडेंटल पी .एम . !अँक्सीडेंटल पी .एम .ची आमची परंपरा जुनी आहे 
नगाला नग देण्यात आमचीच मोठी ख्याती आहे 

शास्त्रीजींच्या आकस्मिक मृत्यूने इंदिराजीचा उदय 
संजय गांधीच्या अपघातानेच त्यांना सापडली लय

इंदिराजींच्या मृत्यूनेच राजीवचे विमान उंच उडाले 
राजीवच्याही मृत्यूने बुडत्या नौकेला छानच तारले 

परदेशी असल्याच्या मुद्द्याने सोनियाचे जरा अडले
त्यामुळे मनमोहन सिंगांना ..आभाळ ठेंगणे झाले

यंदा आमच्या नशिबानेच हात आखडता घेतलाय
एखादा अपघात होण्यासाठी देव पाण्यात ठेवलाय

....तुषार नातू ! ( १२ एप्रिल २०१४ )

शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४

वेदनाध्यास !

वेदनाध्यास !

आसपास नेहमी तुझ्या असण्याचे आभास 
तू नक्की आहेसच सांगणारा व्याकूळ श्वास 
तुझ्या प्राप्तीचा भरकटवणारा वेद्नाध्यास 
तू नक्कीच आहेस खास म्हणूनच ही आस 

तुषार नातू !