शुक्रवार, ५ जुलै, २०१३

भ्रष्टाचार!


भ्रष्टाचार!
मिळेल तेथून मिळेल तेव्हा
काही बाही खातच जावे
मागून खावे चोरून खावे
अगदीच नाही तर ओरबाडून घ्यावे
पण मिळेल तेथून मिळेल तेव्हा ...........!
लाचार व्हावे , पाय धरावे
नाहीच जमले तर पाय ओढावे
उताणे पडावे उरावर बसावे
पण मिळेल तेथून...........!
उघडकीस आले तर
कट म्हणावे , समाजबांधवांचे
मेळे भरवावे , अन्याय म्हणून बोम्बलावे
पण मिळेल तेथून ..........!
काही दिवस जेल मध्ये जावे
राजेशाही थाटात आराम करावा
चौकशी यंत्रणांना पैसे चारावे
न्यायालयात निर्दोष व्हावे
पण मिळेल तेथून ...


- तुषार नातू

काल रात्री स्वप्नात गांधीजी आले


काल रात्री स्वप्नात गांधीजी आले
चार दोन शेलक्या शिव्या शिकव म्हणाले
मी म्हणालो बापूजी हे भलतच काय
दुसरा काहीतरी शोधा तुम्ही पर्याय
आपण पडला अहिंसेचे पुजारी
कशाला हवी ही हिंसेची शिदोरी
म्हणाले , खड्यात गेली अहिंसा
माझे नाव घेत माजवलीय हिंसा
सत्तेचे भोग त्यांनीच भोगले
मला मात्र फक्त भिंतीवर टांगले
तत्वांचे आचरणाने मी लोक गोळा केले
माझ्या नावावर यांनी स्वतःकडे वळवले
मी देखील आता निवडणूक लढवणार
नेत्यांच्या पापाचे घडे फोडणार
अण्णा हजारेंबरोबर उपोषण करणार
जनता खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणार !
- तुषार नातू

श्वेतपत्रिका !


श्वेतपत्रिका !
चोरांनी आता पांढरे कपडे घालून
समाजसेवेचे व्रत पांघरलेय
पंचायती , पालिका , संसदेत
आपले स्थान पक्के केलेय
पोलीस , न्यायालय , जनतेला
नोटांनी ओलीस ठेवलेय
नियम , संकेत , कायद्याला
कुंपणा बाहेर बसवलेय
एकमेकांना क्लीनचीट देण्याचे
राजरोस कंत्राट घेतलेय
श्वेत पत्रिका नावाचे नवीन
हत्यार जनतेवर उगारलेय !
...तुषार नातू !

स्वातंत्र्य त्यांचे !


स्वातंत्र्य त्यांचे !
आता देश स्वतंत्र झालाय
आम्ही देशाचा विकास करणार
भारत देशात परत सोन्याचा धूर काढणार
असे म्हणत त्यांनी मतांचा जोगवा मागितला
पुढे त्यांचे सरकार झाले
भालदार चोपदार असतात तसे
नगरसेवक , आमदार , खासदार आले
वेगवेगळ्या विभागात मंत्री स्थानापन्न झाले
विकासाचा विडा उचलला
सरकारी खजिना पणाला लावला
घर ..दार ..दहा पिढ्यांचा विकास झाला
जनतेच्या पैश्यावर जन्म त्यांचा सार्थ झाला
मग पुढे विरोधी पक्ष आले
आम्हालाही विकास हवा म्हणाले
सत्ताधारीना शिव्या देत ते ही सरकार झाले
नवा गडी नवी लुट ..संसदेचा हवाला उठ सुठ
सवलती.. आरक्षणांची ..गाजरे
मागे पुढे नाचती मग सरकरी हुजरे
सत्ता पालटाची तुतारी..जुनेच झाल साजरे
गरिबी हटावचे कर्कश्य नारे ..एक गाय लाख वासरे
पंजा ..कमळ..कंदील .घड्याळ
लबाडीचेच सारे डाव तिन्ही त्रिकाळ
निशाणी बदलली.. नियत नाही बदलली
पक्ष बदलले ..मात्र दरोड्यांचा झाला सुकाळ
कोळसा . वीज , इंधन , पाणी
वेगवेगळ्या योजनांनी अखेर हेच धनी
जात ..धर्म .पंथ यात मतदारांना विभागले
निवडून कोणीही येवो ..देशवासी मात्र अनवाणी
आला माहितीचा अधिकार
वाटले उघडेल यांच्यासाठी नरकाचे दार
यांनी एकी केली स्वतच्या चारित्र्याची हमी दिली
स्वतंत्र झाले नेते ..पुढारी ..जनतेला सीबीआय च्या हवाली केले !
........ तुषार नातू !

फूड सिक्युरिटी ??????????

फूड सिक्युरिटी ??????????

डोळ्यात लाचारी घेऊन ..जीर्ण ...चिंध्या लेवून 
हात पसरलेला ठेवून ....तो मागे मागे आला 
रागाने मी म्हणालो ....बंद करा भिक मागणे 
सरकार ने दिलीय आता पोट भरण्याची ग्यारंटी 
पोटाचे सोडा हो साहेब आता त्याची चिंता नाही 
रुपया तरी द्या..मोबाईल मध्ये ब्यालंन्स नाही 

फुटपाथ वरच्या गोधडीत ..जरा खुसपूस झाली 
लाडाने तो जवळ सरकला तशी ती फिस्कारली
तुम्ही नेहमी होता ..करून सवरून नामानिराळे
इतकी पोरे पोसणार कोण ? ..कोण त्यांचा वाली
लोचटपणे हसत ..,...तो आणखी जवळ सरकला
अन्न सुरक्षा बिल म्हणत.. तिला गच्च बिलगला

........तुषार नातू !

इशरत की फितरत !

इशरत की फितरत !

इशरत जहाँ ..धन्य झाली 
कमळाच्या तंबूत खळबळ 
पंजाची मेंढरे आनंदी झाली 
सीबीआय च्या हवाल्याने
बिचारीला जन्नत मिळाली

कहाणीतच.. गल्लत झाली
तिच्या साथीदारांचीही चरित्रे
जाणीवपूर्वक विसरली गेली
निवडणुकांच्या कामी आली
जनता सारी गोंधळून गेली

सत्तेसाठी ती आधार झाली
न्याय मिळावा तिला म्हणून
नवीन पार्टी स्थापन झाली
मरणोपरांत वीरचक्र मिळावे
मागणी जोर धरू लागली !

..... तुषार नातू