शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

मुखवटा

मी समानतेच्या मापाचा एक छानसा मुखवटा 
शिवून घेतलाय ..सार्वजनिक ठिकाणी तर 
हा मुखवटा आठवणीने सोबत नेत असतो मी 

सर्वधर्मसमभाव .एकता ..महिलांचे स्वातंत्र्य 
देशप्रेम ...घटनेची अस्मिता ..समान न्याय
भ्रष्टाचार ..अन्याय ..इतरांची सारी सोंगेढोंगे 
वगैरे सगळे व्यवस्थित वठवतो मी बेमालूम

माझ्या बोलण्यात छत्रपती शिवाजी महाराज
डॉ.बाबासाहेब आंबेडकर ..महात्मा फुले तर
हमखास असतातच.. प्रस्थापित ..भांडवलदार
शासक व शोषक यातील नेमका फरक देखील
छान समजावून सांगतो..मी तरुण पोरांना

त्यांनी पेटून उठावे याची नीट दखल घेतो मी
काय करणार ? सध्या या सगळ्याचीच चलती
आहे म्हणे ..हे असेच वागावे हेच बरे असते
माझ्या मात्र घरी बजावून ठेवलेय सगळ्यांना
वार्निंगच दिलीय माझ्या सर्व पोरी बाळींना
खबरदार जातीबाहेर ..आणि त्यातल्या त्यात

खालच्या जातीशी लग्न केले तर मी तंगड्याच
तोडीन याचीही स्पष्ट जाणीव दिलीय त्यांना
परक्या समोर ..डोक्यावरचा पदर ढळू नये
याची दक्षताही घेतातच माझ्या सौभाग्यवती
माझी सगळी बडदास्त ठेवतात त्या नेहमीच
तसा दराराच ठेवलाय मी घरी ..काय करणार
म्हणतात ना ..पायातली वहाण पायातच बरी !

तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा