शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४

सर्वसामान्य !



तू सर्वसामान्य आहेस ...अनेक बंधनात जखडलेला 
तुला पाच वर्षांनी मतदानाचा अधिकार दिला गेलाय 
तुझे लाख मोलाचे मत मातीमोल केलेच आम्ही जरी 
तरी तू जाब विचारायला पोचणार नाहीस अशी तरतुद

' चार लोक काय म्हणतील ' या भीतीतच जगावेस तू 
तरच तू कायदापालन करशील व बंडखोरी नाकारशील 
तुला वकील व कोर्टाच्या वा-या झेपणार नाहीत मुळी 
तू आपला सरळमार्गीच रहा देवावर सोपवून निर्धास्त

गल्लीतील गुंड ..नाक्यावरच्या टपोरींपासून लांबच रहा
आम्ही त्याला संरक्षण दिलेय आमचा कार्यकर्ता म्हणून
पोरीबाळींना छेडणा-या दुर्योधनांकडे दुर्लक्षच करत रहा
हे आम्हाला निवडणुकीत प्रचाराला मदत करतात बरे

पोलीस ..लाचखावू कर्मचारी हे तुझ्यातले असले तरी
त्यांना आम्ही बांधूनच ठेवलेय आमचे नोकर म्हणून
ते तुझी बाजू घेण्याची शक्यता अजिबात धरू नकोस
तू तुझ्या जातीशी ..धर्माशी संस्कृतीशी इमान बाळग

दर पाच वर्षांनी आम्ही तुला वेगवेगळी लालूच दाखवू
तेव्हा नेहमीप्रमाणे तू बुद्धी गहाण ठेवून मतदान कर
पोट ..पोरेबाळे ..संसार ..यांच्याशी बांधील राहूनच तू
आपला मौल्यवान जन्म कामी लाव तरच भले होईल

बाकी सगळे ईश्वरावर सोपव नाहीतर एखाद्या बुवाच्या
बाबाच्या चरणी अर्पण कर .तीर्थस्थळी गाऱ्हाणे मांड तुझे
बंडखोरीला नक्सलवादी माओवादी मानून आम्ही तुला
मजबूर करू हिंसेसाठी मग तुला गोळ्याही घालू बेधडक !

...तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा