शनिवार, १ फेब्रुवारी, २०१४

रंगीत औषध !



बाबा तुमचे ते रंगीत औषध ..मलाही एकदा घ्यायचे आहे 
घेवून औषध माझे टेन्शन ..एकदा मलाही पळवायचे आहे 
मित्रांसोबत माझ्या मलाही .औषधपार्टी साठी जायचे आहे 
ग्लास हातात घेवून मोठ्याने चिअर्स असे म्हणायचे आहे 

तुम्ही सांगता ते औषध कडू ..खरे खोटे पडताळायचे आहे 
कडू औषध घेतानाही चिअर्स का म्हणता तेच पहायचे आहे 
औषध घेवून तुमच्यासारखेच सगळ्यांशी भांडायचे आहे 
तुमच्यासारखेच बाणेदारपणे ' हु केअर्स ' हे म्हणायचे आहे

मोठ्याने ओरडून सर्वानाच एकदम चिडीचूप करायचे आहे
रागारागाने जेवणाचे ताट मलासुद्धा उधळून लावायचे आहे
' तुझी गरज नाही ' असे आईला ठणकावून सांगायचे आहे
आजोबांच्याही डोळ्याला .....डोळा भिडवून बोलायचे आहे

तुम्हाला हे औषध ...घ्यायला सांगणाऱ्याला भेटायचे आहे
तो मला भेटला की त्याला .. ..चांगलेच खड्सावायचे आहे
औषध कडू ..इतके महाग.. का सुचवलेस विचारायचे आहे
बाबा तुमचे ते रंगीत औषध ...मलाही एकदा घ्यायचे आहे

...तुषार नातू ! ( ३० जाने .२०१४ . )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा