मी सोडून दिलीय , मुलाच्या शिक्षणाची चिंता
कारण नैतिकता कधीच हरवलीय शिक्षणातून
मी सोडून दिलीय ,त्याच्या नोकरीची चिंता
चोच आणि चाऱ्याचे गणित तो शिकेलच
मला चिंता आहे त्याच्या हळव्या मनाची
खूप भाबडा आहे तो , नागरिक शास्त्र
शिकताना, सरकार म्हणजेच तारणहार
असा समज करून दिलाय तुम्ही त्याचा
सर्वोच्च संसद म्हणजे देशाच्या जनतेची
देशाच्या सुरक्षेची देखभाल करणारी प्रणाली
हा त्याचा समज कृपया तसाच ठेवा नाहीतर
तो कोलमडून जाईल हो , त्याला जपा
तुमचे ' आधार कार्ड ' न त्याच्या सवलती
देखील नका देऊ हवेतर त्याला पण किमान
तुम्ही लबाड आहात हे कधीच कळू देऊ नका
त्याची खूप श्रद्धा आहे , संसद प्रणालीवर
सारे भारतीय माझे देशबांधव आहेत हे
तुम्ही रोज म्हणून घेता त्याच्या कडून
त्याला कधीच समजू देऊ नका की तुम्ही
या बांधवाना जाती धर्मात विभागलेय ते
'जण गण मन ' , म्हणताना तो ताठ मानेने
उभा राहून सलाम करतो ' जय ' म्हणून
त्याला कळता कामा नये तुमचे प्रांत वादाचे
राजकीय गणित , तो तुटेल हो आतूनच
श्रम , समानता , बंधुभाव , न्याय ,
प्रामाणीकपणा , सेवा , हे सगळे तो
तुमच्या भाषणात ऐकतोय सध्या ते
तसेच अनुभवास आणून द्या तुम्ही
मायबाप सरकार हवे तर सबसिडी चे
सिलेंडर देऊ नका मला , हवे तर अजून
भरघोस महागाई वाढू द्या पण ..पण
तेव्हढे माझ्या पोराचे मात्र विसरू नका !
................तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा