शुक्रवार, २४ जानेवारी, २०१४

' भारत निर्माण '

स्वतंत्र भारताचा नागरिक असलेला ..
फाटक्या चिंध्या घालून सिग्नलवर.. 
चौकाचौकात.. तिरंगे विकणारा पोरगा 
सिगरेट फुंकत ..रस्त्यावरच्या पोरींना 
नजरेचे चटके देत ....स्वतःवरच खुश 
होणारा... कामातुर स्वप्नांचा बादशहा

अन्न चिवडत.. अपमानित हृदयाने 
जेवणारा.... नोकरीची भाकरी शोधत
वणवण भटकणारा ..भग्न बेरोजगार
कचराकुंडीत पोट हुडकत ...गल्लीबोळ
भटकत ...पाठीवरचे पोते सांभाळणारा
फुटपाथवरच मुक्काम ठोकलेला कर्ण

आभाळाकडे डोळे लावत .....राबणारा
सारे हंगाम मातीतच घालवलेला...
दलालांच्या विळख्यातील शेतकरी
तिन्ही त्रिकाळ धुणीभांडी हेच प्राक्तन
सगळी हयात मोलकरीणच रहाणारी
दारुड्याच्या घरात चिणलेली लक्ष्मी

क्लब्ज ..पार्टी ..यातच मग्न असणारी
बेफिकीर ..बिनधास्त ..मजा मारणारी
पेज थ्री ची ....बेजवाबदार पिल्लावळ
झेड प्लस सुरक्षेत ....टेचात फिरणारे
जनता जनार्दनाला बेवारस समजणारे
भ्रष्टाचारावर पोसलेले उन्मत्त राक्षस

धार्मिक तेढ पसरवून ..जातीय दंगली
घडवून मनामनात विष पेरून त्यावर
मतांची पोळी भाजणारे असंख्य शकुनी
ब्रिटीशांची घराणेशाही जपत ..जी हुजूर
करण्यातच धन्यता मानून लाळघोट्या
एकनिष्ठतेची ग्वाही देणारे तृतीयपंथी

' भारत निर्माण ' चा ..गवगवा करून
स्विस बँकेत देशाचे भविष्य लपवलेले
झेंडा फडकावून दंडा उगारणारे महाचोर
स्वतंत्र भारताच्या लढ्यात ..प्राणाहुती
देणाऱ्या ..सीमेचे रक्षण करत ....थंडी
वाऱ्यात जीव गहाण ठेवलेल्या जवानांची
शपथ घेवून सांगतो..

हल्ली ताठ मानेने
झेंड्याला सलाम मला करणे जमतच
नाहीय..........!

......... तुषार नातू !

गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

लोकशाहीची लाश !

कमळाला रोखण्याचा मार्ग होता खास 
पंजाने टाकला होता ' आप ' चा फास 
खतपाणी घालून मग रोपटे मोठे केले 
युवराजांना ही भलतेच स्फुरण चढले 

झाडानेही दाखवलीच सावलीची आस
जनतेला वाटले होईल दुखा:चा नाश 
सभासदही वाढले घोडे चौखूर उधळले
लोकशाहीस वाटले लोकांचे राज्य आले

झाडाच्या फांद्या जणू सावलीचा भास
फळे करणार होती पंजाचाच सर्वनाश
कुंपण सावध झाले झाड तोडू म्हणाले
दुपारी पहिली मी लोकशाहीचीच लाश !

...तुषार नातू !( दि. २ १ जाने २०१४ )

सोमवार, १३ जानेवारी, २०१४

आत्मकेंद्री मी !



माझ्या जातीधर्माचा पराक्रम सांगत
इतिहासातील दाखले देत स्वतःला 
अस्मितेच्या उबदार शालीत गुंडाळून 
मी समानतेच्या ..न्यायाच्या..अन 
मानवतेच्याही गप्पा मारत राहतो 

जणू मी आणि माझी जात व धर्मच 
सर्व मानवजातीला तारणार आहे 
असाही भास होतो मला त्या वेळी
याच भ्रमात मी स्वतःला युगपुरुष
म्हणवून.... भ्रमात अखंड लोळतो

मात्र ' आरक्षणाचा ' विषय येताच
मी प्रचंड हळवा होतो .. अस्मिता
उडून जाते माझी ..छान ..सुरक्षित
सरकारी नोकरी ..हक्काचे शिक्षण
सोयी सवलतींच्या जाळ्यात फसतो

माझ्या पूर्वजांचे पराक्रम विसरतो
मला अन्यायग्रस्त शोषित ..वंचित
दुबळा झाल्यासारखे वाटू लागते
माझ्या क्षमतांचे..श्रमांचे महत्व
कमी .. माझ्या स्वकेंद्रित लोभापुढे

मी माझे बुरखे फाडून एकदा तरी
किमान एकदा तरी स्वतःला
जोखले पाहिजे ..पारखले पाहिजे
नंतरच मग तोंड उघडले पाहिजे
असे वाटणे मी केव्हाच सोडलेय !

...तुषार नातू !

गुरुवार, २ जानेवारी, २०१४

बांडगुळ !

निर्विघ्न जगण्यासाठी पांघरलेले 
नीती नियमांत छानच सजवलेले 
कर्तुत्वाचा सुंदर कशिदा काढलेले 
आयुष्य काहींचे मोजून आखलेले 

स्वैर इच्छांनी अतोनात भरलेले 
मनातल्या मनातच घुसमटलेले 
निशब्द भावनांनी जे शेवाळलेले 
आयुष्य काहींचे सदैव बुरसटलेले

जन्मतःच सर्वांगाने पांगुळलेले
असहाय कारुण्य वेदना मढलेले
मुक्यानेच उभे प्राक्तन भोगलेले
आयुष्य काहींचे असेच नासलेले

मुजोर दबंगाईत मग्न असलेले
नखशिखान्त गुर्मीनेच शृंगारलेले
पूर्वजांच्याच कर्तुत्वावर पोसलेले
आयुष्य काहींचे मस्त माजलेले

रक्तलांच्छित स्वप्नांनी भरलेले
सत्ता संपत्तीसाठी पिसाटलेले
भेदभाव द्वेष विषारी ओथंबलेले
आयुष्य काहींचे बांडगुळ झालेले

...तुषार नातू !