माझ्या जातीधर्माचा पराक्रम सांगत
इतिहासातील दाखले देत स्वतःला
अस्मितेच्या उबदार शालीत गुंडाळून
मी समानतेच्या ..न्यायाच्या..अन
मानवतेच्याही गप्पा मारत राहतो
जणू मी आणि माझी जात व धर्मच
सर्व मानवजातीला तारणार आहे
असाही भास होतो मला त्या वेळी
याच भ्रमात मी स्वतःला युगपुरुष
म्हणवून.... भ्रमात अखंड लोळतो
मात्र ' आरक्षणाचा ' विषय येताच
मी प्रचंड हळवा होतो .. अस्मिता
उडून जाते माझी ..छान ..सुरक्षित
सरकारी नोकरी ..हक्काचे शिक्षण
सोयी सवलतींच्या जाळ्यात फसतो
माझ्या पूर्वजांचे पराक्रम विसरतो
मला अन्यायग्रस्त शोषित ..वंचित
दुबळा झाल्यासारखे वाटू लागते
माझ्या क्षमतांचे..श्रमांचे महत्व
कमी .. माझ्या स्वकेंद्रित लोभापुढे
मी माझे बुरखे फाडून एकदा तरी
किमान एकदा तरी स्वतःला
जोखले पाहिजे ..पारखले पाहिजे
नंतरच मग तोंड उघडले पाहिजे
असे वाटणे मी केव्हाच सोडलेय !
...तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा