गुरुवार, २ जानेवारी, २०१४

बांडगुळ !

निर्विघ्न जगण्यासाठी पांघरलेले 
नीती नियमांत छानच सजवलेले 
कर्तुत्वाचा सुंदर कशिदा काढलेले 
आयुष्य काहींचे मोजून आखलेले 

स्वैर इच्छांनी अतोनात भरलेले 
मनातल्या मनातच घुसमटलेले 
निशब्द भावनांनी जे शेवाळलेले 
आयुष्य काहींचे सदैव बुरसटलेले

जन्मतःच सर्वांगाने पांगुळलेले
असहाय कारुण्य वेदना मढलेले
मुक्यानेच उभे प्राक्तन भोगलेले
आयुष्य काहींचे असेच नासलेले

मुजोर दबंगाईत मग्न असलेले
नखशिखान्त गुर्मीनेच शृंगारलेले
पूर्वजांच्याच कर्तुत्वावर पोसलेले
आयुष्य काहींचे मस्त माजलेले

रक्तलांच्छित स्वप्नांनी भरलेले
सत्ता संपत्तीसाठी पिसाटलेले
भेदभाव द्वेष विषारी ओथंबलेले
आयुष्य काहींचे बांडगुळ झालेले

...तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा