बुधवार, ४ डिसेंबर, २०१३

झुंडशाही !

अस्मितेच्या बाता व विद्रोहाच्या वल्गना 
ऐकायला जमलेला जनसागर न्याहाळत 
तो मनोमन हरखला स्वतःवर खुश झाला 
त्याच्यात संचारले समस्त सुधारकांचे बळ 

जाती धर्मांच्या भिंतींवर तो खूप करवादला 
कर्कश्य भुंकला ..थुंकला अनेकदा शिंकला 
आवाजाला धार चढली होती परिवर्तनाची 
देवांना ललकारत मोठा हल्ला केला श्रद्धेवर

पूर्वजांची पुण्याई पणाला लावली स्वतःला
सिद्ध करण्यास अन नाकर्तेपण लपवण्यास
समानतेचा नारा देत बंडाचे निशाण रोवले
वेळप्रसंगी जातीच्या आड देखील लपला

सभा संपल्यावर प्रसन्न मनाने बंगल्यावर
पार्टीला गेला ..साहेबांचा आशीर्वाद घेतला
लोकसभेचे तिकीट अन मंत्रिपद पक्के केले
कार्यकर्त्यांना त्याने स्वखर्चाने दारू पाजली

घरी जाताच लगेच देवाच्या पाया पडला
उद्याच्या साम्राज्याची ग्वाही मागितली
लोकशाहीतल्या झुंडशाहीवर प्रसन्न होत
उद्याचा थोर नेता दोन पेग मारून झोपला

..तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा