मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

सावर रे कृष्णा !

सावर रे कृष्णा !

विकारांचे जालीम रेशमी पाश 
आत्म्याचे शोषणही सावकाश 
नको रे कृष्णा आता सर्वनाश 
चित्त बनते आत्म्याचा फास

नोटा कोऱ्या करकरीत कडक
सोन्याची पिवळीधम्म चमक
हिऱ्यांच्या लकाकीची झलक
संपत्ती सत्तेचा मोठा वचक

लटक्या नजरा उन्नत उभार
उठावदार वळणे जिवाला भार
गुप्त कटाक्षांचा गुन्हा वारंवार
सावर कृष्णा झालोय बेजार

क्रोधाचा यज्ञ नजरेतील जाळ
काळीज काहिली खुनशी फाळ
तीळपापड मनाचा किती काळ
कशी जोडली विनाशाशी नाळ

मी मला माझे मायेचेच ओझे
जपतोय कधीचा शिरावर बोजे
ताठा गर्व उन्मादाचीच ही बीजे
होते रे कृष्णा माणूसपण खुजे

...तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा