सोमवार, २६ मे, २०१४

माझा बाप !



लहानपणी माझा बाप मला सुपरमँन वाटायचा 
आईला जेव्हा ऑफिसमधल्या गोष्टी सांगायचा 
त्याचा बाणेदारपणाचा मला अभिमान वाटायचा 
पाकिटातले पैसे मोजताना तो कुबेर भासायचा 

मी शाळेत जाताना पाहून तो कौतुकाने हसायचा 
आमचा आभ्यास घेताना तर द्रौणाचार्य व्हायचा 
प्रगती पुस्तक पाहून आनंदाने जवळ घ्यायचा 
आमच्या भविष्यात रमून भूतकाळ आठवायचा

मी कॉलेजला असताना तो सुना सुना असायचा
वार्धक्याच्या खुणांनी जरासा थकलेला वाटायचा
खर्चाची तोंडमिळवणी करताना चिडका दिसायचा
मला तो तेव्हा कंजूष आणि कटकट्या वाटायचा

पुढे पुढे संसारात पडून तो जेरीस येवून हरलेला
पडक्या वाड्याच्या भिंती सारखा तटस्थ झालेला
आमच्या भविष्याबाबत तरीही चिंतीत असलेला
आईशी बोलताना चिडून कधी रुसलेला आंबलेला

शेवटच्या आजारपणात बाप पूर्ण हतबल झालेला
जीवनाचे सार समजून स्तब्धतेने समोरा गेलला
मृत्युच्या अनिवार्य शय्येवर ..धारातीर्थी पडलेला
डोळ्यात प्राण आणून निरोपासाठी व्याकूळलेला

तिरडीवर तो शांतपणे सार्थकतेने मूक पहुडलेला
आमच्या आक्रोशने जागा न होता डोळे मिटलेला
अग्निदिव्याला सामोरे जाण्यास सज्ज सजलेला
धुराच्या लोटात.. लवलवत्या ज्वाळात हरवलेला

..तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा