बुधवार, ११ सप्टेंबर, २०१३

अनुभूती स्वैरपणाची !



पहिला पेग ... छान बर्फ ..सोडा टाकून 
दिमाखात उतरतो घश्याखाली 
घोटा घोटाने ..जिभेचे चोचले पुरवीत 
तरल बुद्धिमत्तेचा साक्षात्कार 
जगातील सर्व समस्यांवर 
भाष्य करण्याचा अधिकार प्रदान करत 

गझलेच्या मंद स्वरांना दाद देत
रसिकतेची ग्वाही भरत
कल्पकतेच्या पंखांनी विहार करत
सर्व समस्या चुटकी इतक्या शुल्लक
क्षुद्र ..फालतू भासवत
' मी ' पणाचा ताठा मिरवत

दुसऱ्या पेगात ..सळसळते रक्त
जोश ..उन्माद नसानसातून फिरवत
आतून खोल विकारांना जागवत
प्रणयाचे रंग हृदयात भरत
क्रोधाचा अग्नी चेतवत
अहंकार इंग्रजीतून प्रकटतो

अनावर भावनांचा महापूर
स्वतःला सिद्ध करण्याचा..
बाकी तुच्छ ..हा अट्टाहास शिगेला
आरोपांच मोहक जाळे..कल्लोळ
उपेक्षितपणचा ताशा
जगाला फुकटचा तमाशा

तिसरा पेग मात्र शिथिल करतो
गात्रे .. उपहासाची फोडणी
तडतडते ..जीभ अडखळू लागते
धूसर स्वप्ने.. वाकुल्या दाखवतात
समस्यांचा बागुलबुवा
तरी ' मी ' चे तुणतुणे टिपेला

हरवलेल्या गोष्टींचा शोक
गमावलेल्या संधींचा गहिवर
हतबलतेची ..असहाय जाणीव
कुरतडणारी खंत .. जुने दीर्घ सल
वैफल्याचे उत्सव ..जड श्वास
बेहोशीचा सुस्त निश्वास !

..तुषार नातू .

( ' पेग ' ची संख्या व्यक्ती सापेक्ष असू शकते )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा