शुक्रवार, १६ जानेवारी, २०१५

काय ठरले मग ?


काय मग ? काय प्रोग्राम ३१ चा ?
धुंदीत संकल्प करणार नववर्षाचे
की शुद्धीवर राहून जाणीव पूर्वक 
बेत आखणार सोनेरी भविष्याचे ?
मादक द्रव्यांच्या आवरणाखाली
मेंदूला.... झिणझिण्या आणणार
की आत्म्याच्या सहवासात राहून
शोध.... हरवलेल्या माणुसकीचा ?
हर्षोल्हास मस्त...हजारो खर्चून
हॉटेल..पब...पार्टीला...आवर्जून
की ताळेबंद मांडणार स्वतःचा
उज्ज्वल उद्याच्या पहाटेसाठी ?
आपल्या यशाच्या मत्त गुर्मीत
पाठ थोपटणार स्वतःची सतत
की करोडो दुर्दैवी दिन दुबळ्यांना
शक्ती मिळावी या साठी प्रार्थना ?
बळी तो कान पिळी मंत्र जपत
स्वतःचे समर्थन करत राहणार
की स्वतःला तत्वांच्या कोर्टात
उभे करून....निपक्ष न्यायदान ?
माझे पैसे .मी खर्च करणारच
माझ्या मर्जीने..माझ्यासाठी
की सामाजिक भान...जागवून
आत्मिक उन्नतीला खतपाणी ?
थंडीत...फुटपाथवर कुडकुडणारे
नापिकीने मृत्यूला कवटाळणारे
थर्टीफर्स्टच्या जल्लोष करतांना
आठवतील का ? किमान एकदा ?
की साला पार्टीला गालबोट लावले
याने म्हणत तोंड वाकडे करणार ?
....तुषार नातू ( २९ डिसेम्बर २०१४ )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा