शनिवार, ७ जून, २०१४

हरलेले पालकत्व !


जन्म घेणाऱ्या बाळाची तब्येत तपासली
तुम्ही नियमित सोनोग्राफीच्या यंत्राद्वारे 
घरात कुलदीपक येणार म्हणून नाचलेही 
त्याच्या जन्मानंतर पेढे वाटले आनंदाने 

जन्मानंतर त्याला न्हाऊ माखू घालताना 
धन्य झाली आई अन बापाचे मास वाढले 
आकार घेत मोठा होत जाणारा गुणी बाळ 
हिंस्त्र लांडगा होतो की क्रूरकर्मी वन्य पशु

त्याच्यात एखादा सिद्धार्थ उदय पावतोय
अथवा छत्रपती , किमान सत्कर्मी मानव
या कडे लक्ष देण्यात मात्र तुम्ही हरलात
सपशेल पराभव हा तुमच्या पालकत्वाचा

तुमचा असलेला राजकुमार राजरोसपणे
अब्रू लुटतोय आता कोण्या आईबापाच्या
गोजिरवाण्या गोड अबला राजकुमारीची
नग्न फासावर देत जहाल तेजाब पाजून

त्याला चटक लागलीय करूण किंकाळ्या
ऐकण्याची अन शरीराचे लचके तोडण्याची
रक्तपिपासू हिंस्त्र जनावरे फिरत आहेत
हरलेल्या पालकांची आंधळ्या धृतराष्ट्रांची

राजकन्यांनो तुम्ही व्हा महिषासुर मर्दिनी
कठोर करा कोमल हृदय असुर दिसल्यावर
नरडीचा घोट घ्या बिनदिक्कत लांडग्यांचा
नाहीतर अपमानित होत रहा अबला बनून

..तुषार नातू !

( सर्वत्र माजलेल्या लांडग्यांना समर्पित )

धर्मांधतेच्या टोकावर !


धर्मांधतेच्या टोकावर उरतात फक्त 
लाठ्या ..तलवारी ..बंदुका ...बॉम्ब 
रक्तपिपासू श्वापदे...व खुनी दरींदे 
व्यर्थ ठरतात सारे नमाज ..प्रार्थना 
बंधुभाव.....भाईचारा...केविलवाणा 

कृष्णाचे प्रेम ...प्रेषिताची कलमे 
बुद्धाचे कारुण्य ....येशूचे बलिदान 
सुळावर चढतात साऱ्या देव देवता
सुरु होते बीभत्स असुरांचे राज्य
किळसवाण्या डूाक्युलांचे .थैमान

राजकीय मनसुबे ..तेजीत येतात
सर्वसामान्यांना.. .वेठीस धरतात
कुरुक्षेत्रावर पांडवच बळी जातात
कौरव मात्र ...सुरेक्षेच्या तटबंदीत
नवनवीन डाव खेळतच असतात

......तुषार नातू !

शनिवार, ३१ मे, २०१४

निब्बरतेच थर !

निब्बरतेच थर !

मनावर व्यापलेला असा निब्बरतेचा थर
तरीही लागणारी नाविन्याची जुनी घरघर 
तोच तोच पणाचा कंटाळवाणेपणा वरवर 
मुळातूनच उमलणारी कोमलतेची थरथर 

जुने पुराणे संदर्भच नव्याने मन:पटलावर 
अशांतीची असमाधानाची अतृप्तीची लहर
कामनांचे थैमान बंधनांचा जीवघेणा कहर 
वंचित उपेक्षित भावनांना नेहमीचा बहर

...तुषार नातू !

मेंदूचा स्कॅन !

मेंदूचा स्कॅन !

एकदा मेंदूचा सविस्तर स्कॅन करून घ्यावा म्हणतो 
प्रत्येक घडीत काय काय दडलेय जाणून घेवून 
जमले तर बरेच काही बाही काढूनच टाकावे म्हणतो 
मग शांत निवांत बसावे मोकळे श्वास सोडून 

विचार केविलवाणे दीनवाणे डिलीट करावे म्हणतो 
लबाड लोचट विचारांना साऱ्या तिलांजली देवून 
चैतन्याचा प्रकाश अनुभवत जगेन मुक्त म्हणतो 
कुजलेल्या नासलेल्या भावनांना पळवून लावून


तुषार नातू !

नवा सूर्य !

नवा सूर्य !

अस्तित्वाच्या मुळातूनच तळपणारा जीवघेणा अंधार 
स्मृतींचा अधीरडोह निर्धाराला पडलेले कायमचे खिंडार 
व्याकूळ पाखरांचा फडफडाट असहाय वेदनांचा गंधार 
शक्यतांचे सूर्य मावळलेले कंगाल भावनांचे हे व्यापार 
असे अनाथ वाटले कोणाला जरी सारखे आणि वारंवार 
विश्वास असू दे मनी श्रद्धा बाळगाच हृदयात अपारंपार 
ठीकच होईल सगळेच स्वतःचा नवा सूर्य करा तयार 

...तुषार नातू !

मृत्यूची तंद्री !

मृत्यूची तंद्री !

एकाग्रतेने तंबाखू साफ करत चुन्याचे बोट लावून 
मिश्रण एकजीव केल्यावर हलकेच टाळी वाजवून 
चिमुट दाढेत सरकवताना धन्यतेच्या अविर्भावात 
दंगून तंबाखूच्या कडवट निकोटीनयुक्त स्वादात 
जिभेवर रेंगाळणारा चुन्याचा तो चरचरीत झटका 
लाळेत मिसळून दात हिरड्या यांना छान चटका 
मगच जीवनानंद लुटण्यास सज्ज झालेला जीव 
तंद्रीची अनुभूती अन इतरांच्या नजरेत मात्र किंव

पाकिटातून सराईतपणे नेहमीची सिगरेट काढत
मागच्या बाजूने तिला पाकिटावरच हळुवार ठोकत
ओठांच्या पकडीत मागच्या टोकाचा फिल्टर धरून
मग इकडेतिकडे जगजेत्याच्या अविर्भावात पाहून
आत्मविश्वासाच्या टोकावर जात काडी पेटवलेली
झुरका मारत सावकाश टिचकीने राख उडवलेली
फुफुसांच्या सच्छिद्रतेला बुजवत आलेली मग्नता
नाकातोंडातून धूर लोकांच्या नजरेत उद्विग्नता

दोस्तहो हा अनुभव हवाहवासा वाटेलच कदाचित
उत्सुकता ताणेल आपली सदासर्वदा न अवचित
सावध होऊन करा सर्वार्थाने आणि गंभीर विचार
तोंडात चट्टे पडून ओठ काळे त्रास होणारच अपार
स्वादांच्या पलीकडे जात चवींची येणारी निरसता
क्षय ..कर्करोग अपचन आम्लपित्ताची तत्परता
कणाकणाने विळखा घालणारा दयनीय करणारा
मृत्यू झिजवत येणारा वेदनांचा बाजार मांडणारा

...तुषार नातू !

सोमवार, २६ मे, २०१४

माझा बाप !



लहानपणी माझा बाप मला सुपरमँन वाटायचा 
आईला जेव्हा ऑफिसमधल्या गोष्टी सांगायचा 
त्याचा बाणेदारपणाचा मला अभिमान वाटायचा 
पाकिटातले पैसे मोजताना तो कुबेर भासायचा 

मी शाळेत जाताना पाहून तो कौतुकाने हसायचा 
आमचा आभ्यास घेताना तर द्रौणाचार्य व्हायचा 
प्रगती पुस्तक पाहून आनंदाने जवळ घ्यायचा 
आमच्या भविष्यात रमून भूतकाळ आठवायचा

मी कॉलेजला असताना तो सुना सुना असायचा
वार्धक्याच्या खुणांनी जरासा थकलेला वाटायचा
खर्चाची तोंडमिळवणी करताना चिडका दिसायचा
मला तो तेव्हा कंजूष आणि कटकट्या वाटायचा

पुढे पुढे संसारात पडून तो जेरीस येवून हरलेला
पडक्या वाड्याच्या भिंती सारखा तटस्थ झालेला
आमच्या भविष्याबाबत तरीही चिंतीत असलेला
आईशी बोलताना चिडून कधी रुसलेला आंबलेला

शेवटच्या आजारपणात बाप पूर्ण हतबल झालेला
जीवनाचे सार समजून स्तब्धतेने समोरा गेलला
मृत्युच्या अनिवार्य शय्येवर ..धारातीर्थी पडलेला
डोळ्यात प्राण आणून निरोपासाठी व्याकूळलेला

तिरडीवर तो शांतपणे सार्थकतेने मूक पहुडलेला
आमच्या आक्रोशने जागा न होता डोळे मिटलेला
अग्निदिव्याला सामोरे जाण्यास सज्ज सजलेला
धुराच्या लोटात.. लवलवत्या ज्वाळात हरवलेला

..तुषार नातू !