सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

सिमेंटच्या जंगलात !



सिमेंटच्या जंगलात .पडणार अश्रूंचाच पाऊस
मातीच्या गंधाला तरी ..नको रे पारखा होवूस 
तृष्णेचा आकांत बैचैन मनाचे शुष्क आभाळ 
वनराईंचा कत्तलखाना हिरवाईचा कर्दनकाळ 
निसर्गाचा आक्रोश तरी नको कानाआड करूस 
मनाचा ओलाव्याला ..नको तिलांजली देवूस 

वरुणराजा तुला साकडे नको रे असा रागावूस 
लेकरू चुकले म्हणून .तुझा धर्म नको सोडूस
कुठे जावे आम्ही ..कसा विझेल पोटाचा जाळ
कोरड्या मातीत कसा रुतेल विकासाचा फाळ
अपराध आमचे माफ कर ..नको दुरावा ठेवुस
माणूस चुकला म्हणून तू नको रे सूड घेवूस

...तुषार नातू !

शब्दांचे खेळ !


मुक्या भावनांचा गहिवर ....कधी कधी ..शब्दही रुसतात
मग मनाचे मळभ अनावर ...शब्द मात्र ..लपून बसतात 
सगळा गुंताडा..नात्यांचा ..बंधनांचा..शब्द छळत जातात 
शपथा वचने व्याकूळ आर्तता ..शब्द वाकुल्या दाखवतात 
मनाचा आरसा तडकून ..शब्द मनाशी लपंडाव खेळतात 
शब्द सोनेरी .शब्द दुहेरी ..शब्द काटेरी ...शब्द भांबावतात
शब्दच शत्रू ..शब्दच वैरी ..शब्दच मनाला निशब्द करतात 

....तुषार नातू !

बापाच्या जिवावर !



बापाच्या जिवावर मी खूप गमज्या केल्या 
टपोरी भाषेत सांगायचे तर.. अंगार मुतला 
मला माहित होते बाप आहेच निस्तरायला 
माझा रिकामा खिसा नेहमी गरम ठेवायला 

बाप होता पाठीशी कोर्टात जामीन द्यायला 
बाईकवर सुसाट गेलो की काळजी घ्यायला 
पोरीबाळींच्या भानगडीत पाठीशी घालायला 
कुलदीपक म्हणून मला कौतुकाने पहायला

चिडला कितीही तरी आतल्याआत कुढायला
आईच्या कडे पाहून मला संरक्षण द्यायला
पिवून घरी आलो तरीसुद्धा दुर्लक्ष करायला
पोरच आहे हे सारखे स्वतःला बजावायला

...तुषार नातू !

सुंदर लोचा !



सुंदर लोचा झालाय जिवनाचा.. कुठून येईल बळ 
मी .माझे ..मला चे युद्ध ...प्रज्ञेचे सुप्त आकर्षण 
आसक्तीच्या दावणीला बांधलेले... व्याकूळ मन 
भोगाला चटावलेल्या इंद्रियांना.....तृप्तीचे डोहाळे 
ऐहिक सार्थकतेची धडपड.. बुद्धीचे कुटील डावपेच 
आत्म्याच्या मुक्तीचे ऐतिहासिक धार्मिक दडपण 
अधूनमधून येणारी रेंगाळणारी...विरक्तीची उबळ 

...तुषार नातू !

मोबाईल !



तरुण मुलांच्या हातातील मोबाईल 
दुहेरी मारा करणारे छोटे मिसाईल 
आईबापाची वाढणार सारखी चिंता 
मुले करून ठेवणार काहीतरी गुंता 


सारखे मेसेज करून.. हसणे गोड 
मोबाईलचा मात्र ...सायलेंट मोड 
घरातले बोलणे तर कमी झालेले
इयरफोन वर मन .गाणे बनलेले

.....तुषार नातू !

विचारधारा !


हमारी लडाई विचारधारा की है असे म्हणत 
त्यांनी त्यांच्या भाषणाला तेज धार लावली 
त्यांच्या विचारांची धारा कोणती हेच शोधत 
मी उगाचच माझ्या डोक्याला कल्हई केली 

..तुषार नातू !

मनाचे रहस्य !



कधी वाटले मला समजले मनाचे सर्व रहस्य 
मनासारखे घडते तेव्हा ओठी उमलते हास्य 
मनाविरुद्ध झाले की बोचतात असंख्य काटे 
प्रत्येक गोष्टीला फुटत जातात अगणित फाटे 

मनाचा मागोवा घ्या नेटका सदोदित निरंतर 
कमी होईल तेव्हा दोन मनातील वाढते अंतर
भावना मनातल्या ..बसावे निवांत निरखत
शिवता येईल मनाला एक अभेद्य चिलखत

मन कधी स्वार्थी .कपटी ..घायाळ ..वैरागी
लाचार लोचट भोगी... कधी निर्मळ त्यागी
मनाच्या सुप्त छटा मनालाच करती सुन्न
मन सगळीकडे सारखेच माणसे जरी भिन्न

मनाला शांत ठेवा भावना जरी खूप अनावर
विचारांचा हल्ला होईल तरी रहा भानावर
मन बंडही करेल जेव्हा अंकुश लागेल त्यावर
मनाच्या मुसक्या बांधून राज्य करा मनावर

....तुषार नातू !