शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

आठवणींचा पसारा !


आठवणींच्या फाफटपसाऱ्यात तू चटकन सापडतेस
कितीही बाजूला केले तरी ..पुन्हा मनात डोकवतेस
फुलपाखरी कालखंडाचे ..चटके मनाला देत राहतेस
मनातला कचरा..सांभाळून ठेवण्यास भाग पाडतेस

...तुषार नातू !

मनाचे रहस्य !


कधी वाटले मला समजले मनाचे सर्व रहस्य
मनासारखे घडते तेव्हा ओठी उमलते हास्य
मनाविरुद्ध झाले की बोचतात असंख्य काटे
प्रत्येक गोष्टीला फुटत जातात अगणित फाटे

मनाचा मागोवा घ्या नेटका सदोदित निरंतर
कमी होईल तेव्हा दोन मनातील वाढते अंतर
भावना मनातल्या ..बसावे निवांत निरखत
शिवता येईल मनाला एक अभेद्य चिलखत

मन कधी स्वार्थी .कपटी ..घायाळ ..वैरागी
लाचार लोचट भोगी... कधी निर्मळ त्यागी
मनाच्या सुप्त छटा मनालाच करती सुन्न
मन सगळीकडे सारखेच माणसे जरी भिन्न

मनाला शांत ठेवा भावना जरी खूप अनावर
विचारांचा हल्ला होईल तरी रहा भानावर
मन बंडही करेल जेव्हा अंकुश लागेल त्यावर
मनाच्या मुसक्या बांधून राज्य करा मनावर

....तुषार नातू !

त्याचे नी माझे !

त्याचे आणि माझे वैर तसे जुने
तो उर्मट तिरसट विक्षिप्त
मी लाघवी पेमळ स्नेहाचे गाणे
तो अहंकारी भोगात लिप्त

माझे मवाळ विश्वशांतीचे तराणे
तो प्रेम दये पासून अलिप्त
माझ्या मनी सदा करुणेचे बहरणे
खुन्नस इर्षा .त्याचे आप्त

माझ्यातच दडलेले त्याचे गाऱ्हाणे
युध्द आमचे आहे नेमस्त
जिंकणार तोच असे त्याचे म्हणणे
त्याला हरवणे क्रमप्राप्त

...तुषार नातू !

सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

हिरवे कोंब

हिरवे कोंब दुर्मिळ ...मातीतलीच दुष्ट भेसळ 
समाजमनाची मरगळ ..नैतिकतेची पानगळ 
स्वार्थाचा बोलबाला .. ..सत्तेचा गोपालकाला
नेत्यांचे साजिरे रूप ...त्यांच्याच पोळीवर तूप
जातीपातींची मिठाई ..तोंड गोड करायची घाई 

...तुषार नातू .

सांभाळ रे बाबा !

सांभाळ रे बाबा !

चला ..झालास एकदाचा चांगला उत्तीर्ण 
आता नवे कॉलेज ..नवीन मित्र -मैत्रिणी 
आईबापाच्या मनात .दिवाळीची रोषणाई 
तुझ्या डोळ्यातली अथांग क्षितीज भरारी 
रोमरोमात चैतन्य..मन स्वच्छंद पाखरू 
नाकाखाली उमटणारी.. मिशीची नवलाई 

सांभाळ रे बाबा ! 

आताच खरी परीक्षा सुरु झालीय रे तुझी
मोहाचे मायावी विश्व तुझ्या आवाक्यात
जास्तीचा पैसाही येईल तुझ्या खिश्यात
खर्चाचे तारतम्य सहज सुटण्याची खात्री
तंबाखू.. .सिगारेट....गुटख्याचे प्रलोभन
आभ्यासाच्या पुस्तकांना कंटाळेल मन

सांभाळ रे बाबा !

उन्मादाचा जल्लोष ..सोबत्यांचा आग्रह
क्लब्ज पार्टी अन थिरकणारी धुंद पावले
बाईक..कार..व वेगाचा रोमहर्षक थरार
नाजूक नख-यांची रेलचेल सभोवताली
गालावर लाली...डोळ्यांचे जादुई विभ्रम
प्रेमाचा साक्षात्कार.फितूर मनांचे करार

सांभाळ रे बाबा !

तू बापाचा त्याग कधीही विसरू नकोस
आईच्या वेड्या मायेलाही दुखावू नकोस
मन विचलित करून वहात जावू नकोस
नौका तुझ्या जीवनाची आहे रे अनमोल
भ्रमांच्या सागरात या जगाच्या भूलैयात
आईबापाची स्वप्ने कधीच विकू नकोस

..तुषार नातू !

( दहावी ..बारावी उत्तीर्ण नवतरुणांना समर्पित )

हल्ली नेहमीच !



हल्ली नेहमीच धमन्यातून रक्त उसळते 
मनातून शिव्यांची लाखोली उमटते 
ठिसूळ होत जाणाऱ्या हाडात स्फोट होतात 
वर्तमान पत्र उघडले की हे वाढते 
बातम्या पहिल्यावर ठिणगी उडते मनात 
पांढरे बगळे अन काळे कावळे 
जोडीने शिकार करताना पाहून मी उद्रेकतो 
लांडग्यांची क्रूर वासनाग्रस्त चाल 
अनाघ्रात कळ्यांची ससेहोलपट जीवघेणी
रक्तपिपासू गिधाडांचे थैमान
बेघर शेळ्यामेंढ्याचा केविलवाणा आकांत
हे सगळे नकोसे होतेय
बायको म्हणते ..तुम्ही उगाचच चिडता
सदासर्वदा संतापता
तुमचा वाढता रक्तदाब आमची काळजी
नसते विचार करत बसता
त्यापेक्षा आंधळे व्हाल तर बरे होईल की
म्हणजे दृष्टीआड सृष्टी !
तिला एकदा ठणकावून सांगणार आहे मी
अग.जगात आंधळे वाढलेत
हेच तर माझे प्रमुख एकमेव दुखणे आहे

...तुषार नातू !

संथ ..सुस्त..सरपटणारी !



एखादी सकाळ असते संथ.. सुस्त अजगरी 
साऱ्या क्षमता गिळून आळसात सरपटणारी

गच्च भरलेल्या आभाळासारखी कोंदटलेली 
भावनांची कोठारे गळू सारखी ठसठसलेली 

गतकाळच्या स्मृतींमध्येच अखंड बुडालेली 
वर्तमान नाकारून.. भविष्यावरच रुसलेली 

काल .आज .उद्याच्या चक्राला कंटाळलेली
उपेक्षांच्या ओझ्याखाली दबून हिरमुसलेली

....तुषार नातू !