सोमवार, ४ ऑगस्ट, २०१४

सांभाळ रे बाबा !

सांभाळ रे बाबा !

चला ..झालास एकदाचा चांगला उत्तीर्ण 
आता नवे कॉलेज ..नवीन मित्र -मैत्रिणी 
आईबापाच्या मनात .दिवाळीची रोषणाई 
तुझ्या डोळ्यातली अथांग क्षितीज भरारी 
रोमरोमात चैतन्य..मन स्वच्छंद पाखरू 
नाकाखाली उमटणारी.. मिशीची नवलाई 

सांभाळ रे बाबा ! 

आताच खरी परीक्षा सुरु झालीय रे तुझी
मोहाचे मायावी विश्व तुझ्या आवाक्यात
जास्तीचा पैसाही येईल तुझ्या खिश्यात
खर्चाचे तारतम्य सहज सुटण्याची खात्री
तंबाखू.. .सिगारेट....गुटख्याचे प्रलोभन
आभ्यासाच्या पुस्तकांना कंटाळेल मन

सांभाळ रे बाबा !

उन्मादाचा जल्लोष ..सोबत्यांचा आग्रह
क्लब्ज पार्टी अन थिरकणारी धुंद पावले
बाईक..कार..व वेगाचा रोमहर्षक थरार
नाजूक नख-यांची रेलचेल सभोवताली
गालावर लाली...डोळ्यांचे जादुई विभ्रम
प्रेमाचा साक्षात्कार.फितूर मनांचे करार

सांभाळ रे बाबा !

तू बापाचा त्याग कधीही विसरू नकोस
आईच्या वेड्या मायेलाही दुखावू नकोस
मन विचलित करून वहात जावू नकोस
नौका तुझ्या जीवनाची आहे रे अनमोल
भ्रमांच्या सागरात या जगाच्या भूलैयात
आईबापाची स्वप्ने कधीच विकू नकोस

..तुषार नातू !

( दहावी ..बारावी उत्तीर्ण नवतरुणांना समर्पित )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा