" शेवटी आपण पडलो मध्यमवर्गीय "
या वाक्याने शेवट करत नेहमीच
आम्ही स्वतःला जखडून ठेवत आलो
कितीही संताप झाला तरी फक्त
आपसातच तावातावाने भांडलो
एकमेकातच रमलो भेद जपत
प्रत्येक ठिकाणी माघार घेत आम्ही
नकळत प्रोत्साहन दिले गुंडगिरीला
सहनशीलतेने घडवले भ्रष्ट नेते
आमच्या पोरीबाळीना छेडणाऱ्यांना
हात जोडून विनंती केली नंतर मग
आनंदलो आमच्या मुसद्देगिरीवर
सरकारी वर्दीला सर्वदा घाबरलो
कोर्टाच्या पायरीपाशीच थबकलो
प्रसंगी नोट पुढे करून लाचारीने
पोसत राहिलो सर्व लाचखोरांना
अहो हल्ली असे चालतेच म्हणत
नैतिकतेची व्याप्ती वाढवत
वेगवेगळ्या गटात विभागलो गेलो
राजकारण्यांना तर दबूनच राहिलो
खोटी अस्मिता जपत घरात उद्रेकलो
चर्चा , समिती , चौकशीच्या घोळात
बौद्धिक मैथुनात रमलो , विसंबून
राहिलो परमेश्वराच्या न्यायावर
..तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा