शुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४

देवाची इच्छा !



काय कसे काय चाललेय ? ..या त्याच्या प्रश्नावर
मी तोंड भरून हसलो ..म्हणालो सगळे काही ठीक
चाललेय ...छानच चाललेय की ....देवाच्या कृपेने
माझ्या उत्तरावर तो वैतागला ..मग किंचाळला
यात देवाची कृपा कसली आलीय डोंबलाची मुर्खा
पुढेही बरेच काही बोलला ..करवादला..थयथयला

अरे तू शिक्षण घेतलेस ..तू अपार कष्ट करतोस
स्वताची. परिवाराची जवाबदारी घेतोस खांद्यावर .
पैसे कमावतोस .वस्तू खरेदी करतोस ..फिरतोस
देवाला रे कशाला मध्ये आणतोस ? तुम्ही लोक
म्हणजे कोडेच आहात ....फालतू तत्वज्ञान आहे
तुमचे देव बीव सब झूठ. ..सायन्स आहे सगळे

मी जरा बुचकळ्यात पडलो .चमकत्या डोळ्यांनी
धारधार प्रश्नार्थक चेहऱ्याने .विजयी अविर्भावात
तो मला निरखत राहिला .मग कुत्सितसा हसला
मी म्हणालो ..अरे माझा श्वास आत्ता सुरु आहे
माझे डोके ठिकाणावर आहे ..शरीराच्या क्रियाही
सुरळीत सुरु आहेत ..यात माझे कोणते क्रेडीट ?

रोज अपघाताने ..हार्ट अॅटॅकने ..पूर ..भूकंपाने
नकोशा आजाराने ...अनेक अकस्मात मरतात
आज मी जिवंत आहे ..आपण दोघेही बोलतोय
यात कोणते सायन्स आहे ..शोध लागलाय का
आपण का जिवंत आहोत याचा ...श्वास ठीक
का चाललय याचा ? जेव्हा अकस्मात मृत्यूचे
कोडे उलगडेल तेव्हा. म्हणीन हे सायन्स आहे

तो जरा विचारात पडल्यासारखा..मग म्हणाला
तुम्ही अंधश्रद्धाळू लोक ऐकणार नाहीत कुणाचे
आपल्या बुद्धीवरचा पडदा काढा .जरा डोळसपणे
विचार करा .. फेकून द्या हे देवाचे जड जोखड
जगा मुक्त ...स्वच्छंद ...श्रेष्ठ मानव आहात
हे का विसरता आहात .. तो क्रांतीच्या गप्पात

मी स्तब्ध ..निश्चल ...निर्धारी तरीही विचारी
शेवटी तो मला बाय म्हणाला ....निघून गेला
बराच वेळ तो गेल्या दिशेला मी पाहत राहिलो
दुसऱ्या दिवशी समजले त्याला अपघात झाला
मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसून तो गेला
जीवन -मृत्यू कोणाला चुकला ..देवाची इच्छा !

..तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा