रविवार, ३१ ऑगस्ट, २०१४

बाळा !



बाळा..अरे काल प्रथमच जाणवले 
तू आता मोठा झाला आहेस 
तुझ्या इच्छांसाठी आग्रही 
हट्टी ..आणि बेदरकार 
इतका जास्त की
डोळ्याला डोळा 
भिडवणारा !

अगदी परवा परवा पर्यंत तर तू
अंधारालाही घाबरत होतास
आईचा पदर तुझी ढाल
बाबांचे नाव तलवार
विसरला की काय
तुझ्या धैर्याचे
अखंड स्त्रोत

दोन पायावर उभा राहताना तोल
सावरण्यासाठीची तुझी धडपड
आणि आधारासाठी तू पुढे
केलेले ते असहाय हात
मी कसा विसरू सांग
आधार दिल्यावरचे
तुझे कृतज्ञ डोळे

जन्मानंतर तुला हाती घेताना
अनुभवलेले रोमांचक क्षण
विसरणे मला शक्य नाही
सारे आभाळ पेलण्याची
ताकद मिळाली होती
मला तुझ्या त्या
रेशीम स्पर्शाने

तुझ्या आईच्या डोळ्यातले
सार्थकतेचे भाव साठवून
ठेवलेत मी हृदयात
म्हणूनच तिच्याही
मायेला तू जेव्हा
ओलीस ठेवले
मी विदीर्ण !

एक नक्की कर तू जमले तर
तू जेव्हा बाप होशील तेव्हा
तुझ्या बाळाला हाती घेवू
नकोस तू अजिबातच
नाहीतर तू देखील
असाच घायाळ
होशील कधी !

.....तुषार नातू !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा