कधी वाटले मला समजले मनाचे सर्व रहस्य
मनासारखे घडते तेव्हा ओठी उमलते हास्य
मनाविरुद्ध झाले की बोचतात असंख्य काटे
प्रत्येक गोष्टीला फुटत जातात अगणित फाटे
मनाचा मागोवा घ्या नेटका सदोदित निरंतर
कमी होईल तेव्हा दोन मनातील वाढते अंतर
भावना मनातल्या ..बसावे निवांत निरखत
शिवता येईल मनाला एक अभेद्य चिलखत
मन कधी स्वार्थी .कपटी ..घायाळ ..वैरागी
लाचार लोचट भोगी... कधी निर्मळ त्यागी
मनाच्या सुप्त छटा मनालाच करती सुन्न
मन सगळीकडे सारखेच माणसे जरी भिन्न
मनाला शांत ठेवा भावना जरी खूप अनावर
विचारांचा हल्ला होईल तरी रहा भानावर
मन बंडही करेल जेव्हा अंकुश लागेल त्यावर
मनाच्या मुसक्या बांधून राज्य करा मनावर
....तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा