हल्ली नेहमीच धमन्यातून रक्त उसळते
मनातून शिव्यांची लाखोली उमटते
ठिसूळ होत जाणाऱ्या हाडात स्फोट होतात
वर्तमान पत्र उघडले की हे वाढते
बातम्या पहिल्यावर ठिणगी उडते मनात
पांढरे बगळे अन काळे कावळे
जोडीने शिकार करताना पाहून मी उद्रेकतो
लांडग्यांची क्रूर वासनाग्रस्त चाल
अनाघ्रात कळ्यांची ससेहोलपट जीवघेणी
रक्तपिपासू गिधाडांचे थैमान
बेघर शेळ्यामेंढ्याचा केविलवाणा आकांत
हे सगळे नकोसे होतेय
बायको म्हणते ..तुम्ही उगाचच चिडता
सदासर्वदा संतापता
तुमचा वाढता रक्तदाब आमची काळजी
नसते विचार करत बसता
त्यापेक्षा आंधळे व्हाल तर बरे होईल की
म्हणजे दृष्टीआड सृष्टी !
तिला एकदा ठणकावून सांगणार आहे मी
अग.जगात आंधळे वाढलेत
हेच तर माझे प्रमुख एकमेव दुखणे आहे
...तुषार नातू !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा